रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): वाजपेयी साहेबांचे प्रत्येक वाक्य, त्यांनी दिलेला विचार हा काळजाला भिडणारा असायचा. त्यांनी शिवसेना-भाजप युतीला खऱ्या अर्थाने आकार दिला, अशा शब्दांत रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केल्या आहेत.
भाजपचे दिवंगत नेते प्रमोदजी महाजन यांच्या पुढाकाराने झालेल्या शिवसेना भाजप युतीला खऱ्या आकार वाजपेयी साहेबांनी दिला, त्यामुळे बाळासाहेब आणि वाजपेयी साहेब यांच्यामध्ये हिंदुत्वाच्या आणि देशहिताच्या मुद्द्यावर एक वेगळं नातं निर्माण झालं होतं. त्यामध्ये पक्षीय स्वार्थ कुठेच नव्हता, हिंदूत्वाचा विचार हाच प्राधान्याने होता, अशा भावना खासदार विनायक राऊत यांनी दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी व्यक्त केल्या आहे. तसेच ज्याप्रमाणे आम्ही शिवसैनिक जाहीर सभांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आसुसलेले असायचो त्याचप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी यांचं भाषण ऐकण्यासाठी सुद्धा आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या भाषणाकडे डोळे लावून बसलेलो असायचो. वाजपेयी साहेबांचं प्रत्येक वाक्य, त्यांनी दिलेला विचार हा काळजाला भिडणारा असायचा त्यामुळे आमच्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळंच स्थान असल्याची भावना खासदार राऊत यांनी व्यक्त केली.