
धामणी येथे मोफत अस्थिरुग्ण शिबिराचे उत्साहात उद्घाटन; मान्यवरांसह रुग्णांकडून कौतुकाचा वर्षाव
शिबिराला देवरुख, संगमेश्वरमधून उत्स्फूर्त प्रतिसाद
संगमेश्वर : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आणि वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ व्यावसायिक दृष्टीकोन नजरेसमोर न ठेवता जनसेवेचे व्रत जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या संकल्पना आणि वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांची त्या संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी सुरू असलेली मेहनत कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत मान्यवरांसह शिबिराला उपस्थित रुग्णांनी वाशिष्ठी डेअरी आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा गौरव केला. धामणी (ता. संगमेश्वर) येथे वाशिष्ठी डेअरीच्या वतीने आयोजित मोफत अस्थिरुग्ण शिबिराचे सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. या शिबिराला देवरुख आणि संगमेश्वरमधील रुग्णाकंडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

धामणी येथील ड्राईव्ह इन लॉन येथे सकाळी मोठ्या उत्साहात मोफत अस्थिरुग्ण शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख बंड्याशेठ बोरूकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबा साळवी, देवरुख व्यापारी संघाचे अध्यक्ष बाबा सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत, देवरुख शहराध्यक्ष नीलेश भुवड, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक सौ. स्मिताताई चव्हाण, अशोक साबळे, पी. डी. साळवी, प्रमोद साळवी, प्रकाश पत्की, रविंद्र भोसले, सत्यवान म्हामूणकर, सोमा गुडेकर, गुलाब सुर्वे, पी. आर. लवेकर, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अल्ताफ जेठी, उद्योजक अजित सावंत, मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उद्योजक प्रभाकर घाणेकर, अमोल सुर्वे, मुन्ना थरवळ, मदन शिंदे, विजयशेठ कुवळेकर, धामणीचे सरपंच संतोष काणेकर, उपसरपंच संगम पवार, तुरळचे माजी सरपंच शंकरशेठ लिंगायत, राजेंद्र ब्रिद, चंद्रकांत जाधव, शिबिरात रुग्णांची तपासणी करणारे डॉ. नंदकिशोर पाराशार, डॉ. हेमंत पाराशर, डॉ. गौरव पाराशर, डॉ. राकेश पाराशर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी आणि शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पंचायत समितीचे माजी सभापती व शिवसेनेचे (उबाठा) पदाधिकारी सुचित ऊर्फ बंडाशेठ महाडिक, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णा हरेकर, निखिल कोळवणकर, राजेंद्र घोसाळकर, जयेश चव्हाण, प्रणाली बेर्डे, राजेंद्र रेवणे, प्राजक्ता रेवणे, सुरेश सप्रे, नवनाथ गांधी आदींनी या शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. तसेच स्व. डॉ. गोवनर्धनलाल पाराशर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक कार्याचा परिचय देखील उपस्थितांना करून दिला. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सदैव कटिबद्ध राहू आणि अशा उपक्रमांच्या माध्यमातून कायमच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाहीही यावेळी प्रशांत यादव यांनी दिली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी यावेळी बोलताना प्रशांत यादव यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले. एखादी चांगली संकल्पना मांडली, की प्रशांत यादव आणि त्यांचे सहकारी ते काम पूर्णत्वास नेतात आणि ते यशस्वीही करून दाखवतात. शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना समृद्ध करण्यासाठी वाशिष्ठी डेअरीची उभारणी करण्याचा उद्देश होता. अतिशय कठिण वाटणाऱ्या या कार्यात प्रशांत यादव यांनी झोकून दिले आणि अवघ्या वर्षभरात वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प केवळ उभा केला नाही, तर अवघ्या महाराष्ट्रात या प्रकल्पाला नावलौकीक मिळवून दिले. यावेळी सुभाषराव चव्हाण यांनी शिबिरात उपचार करणाऱ्या डॉ. पाराशर यांच्या उपचार पद्धतीचेही कौतुक केले. डॉ. पाराशर यांच्या उपचारात एक वेगळ्या प्रकारची जादू आहे, अशा शब्दांत त्यांनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी प्रशांत यादव यांच्या हस्ते डॉ. नंदकिशोर पाराशार, डॉ. हेमंत पाराशर, डॉ. गौरव पाराशर आणि डॉ. राकेश पाराशर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर, शिबिराला भेट देणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींसह रुग्णांनीही चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आणि वाशिष्ठी डेअरीच्या उपक्रमांचे कौतुक केले. अस्थिरुग्णांसाठी इतक्या दर्जेदार पद्धतीने मोफत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सर्वांनी धन्यवाद दिले.
२४, २५ रोजी चिपळुणात शिबिराचे आयोजन
धामणी येथे आयोजित शिबिराचा दि. २३ रोजी शेवटचा दिवस आहे. सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहील. तसेच दि. २४ व २५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चिपळूण येथे बहादूरशेख नाका, सहकार भवन येथे हे शिबिर होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.