मुंबई : अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देण्यासाठी विक्रेते म्हणून मागील साधारण एका महिन्यात १३ हजार ७४२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. या माध्यमातून हे बचतगट कार्यरत असलेल्या साधारण १३ हजार गावांपर्यंत पहिल्याच महिन्यात ही योजना पोहोचली आहे. योजनेसाठी आतापर्यंत जिल्हा परिषद शाळांमधील २ लाख ४२ हजार मुलींचीही नोंदणी करण्यात आली आहे. या मुलींना फक्त ५ रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकीन्स मिळणार आहेत.किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांत तर इतर महिलांना स्वस्त दरांत सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करुन देणे तसेच त्याच्या विक्री व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दुहेरी उद्देशाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकीनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या मोबाईल ॲपवर नोंदणी करण्यासाठी मागील महिनाभरात बचतगटांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सॅनिटरी नॅपकीनचे विक्रेते म्हणून काम करण्यासाठी १३ हजार ७४२ बचतगटांनी या ॲपवर नोंदणी केली आहे. लवकरच राज्यातील प्रत्येक गावांतील किमान एक बचतगट या ॲपवर नोंदणीकृत होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व्यापक प्रयत्न करीत आहे. बचतगटांची नोंदणी झाल्यानंतर लगेच सॅनिटरी नॅपकीनची प्रत्यक्ष विक्री सुरु केली जात आहे.