रत्नागिरी, (आरकेजी) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपध्दतीमुळेच महाराष्ट्रातील काँग्रेस मध्ये मरगळ आली आहे , असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी केला. यावेळी त्यांनी चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका केली. हे दुखणं केवळ आमचेच नाही तर मी सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातून पाठिंबा देणारे फोन मला आले, असेही राणे म्हणाले.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राज्यात काँग्रेस पक्षाची जी काय अस्वस्था झाली आहे ती समोर आहे आणि याला चव्हाणच जबाबदार आहेत. काँग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. ही लढाई सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. त्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरायची आमची तयारी आहे. वेळप्रसंगी गाड्या अडवाव्या लागल्या तरी त्यासाठी आता आमची तयारी आहे, असेही राणे म्हणाले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी सामुदायीक राजीनाम्याच्या तयारीत
प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वावर रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कमालीचे नाराज आहेत. खासदार निलेश राणे यांच्या राजीनाम्यावर, त्यांच्या भूमिकेवर योग्य तोडगा काढला गेला नाही आम्हीही आमच्या पदाचे राजीनामा देऊ अशी भूमिका काँग्रेस पदाधिका-यांनी मांडली. माजी खासदार निलेश राणे यांच्या भूमिकेला सगळ्यांनी समर्थन दिले आहे.