
माजी नगरसेवक अशोक सावंत
मुंबई: शिवसेनेचे मागठाणे विधानसभाप्रमुख, माजी नगरसेवक अशोक सावंत यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कांदिवली (पूर्व) येथे काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घरी जात असताना बाईकस्वारांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, दौलत नगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पर्यावरण रामदास कदम, आमदार सुनील प्रभू, खासदार गजानन किर्तीकर, मिलिंद नार्वेकर, शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीसीटीव्हीमध्ये सावंत यांचे मारेकरी कैद झाले असून यातील एका आरोपीची ओळख पटली आहे. जग्गा असं या आरोपीचं नाव असून तो कुख्यात गुंड असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सावंत यांना खंडणीसाठी धमकावण्यात येत होतं, त्यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दाखलही केली होती. कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून सावंत यांची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. २४ तासांच्या आत पोलिसांनी एकजणला अटक केली आहे. तर चौघाचां अद्याप शोध सुरु आहे.
मूऴगाव सिंधुदुर्गातील कणकवली असून मागील ४० वर्षापासून ते राजकारण, समाजकारणात सक्रिय होते. महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीच्या युनियनचे ते अध्यक्षपद ही त्यांनी भूषवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, डॉक्टर मुलगा व सून, दोन मुली असा परिवार आहे. सुरुवातीला शाखा प्रमुख असलेल्या सावंत यांनी कांदिवलीतील समता नगर येथून २००२ साली अपक्ष व २००७ साली शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढली. दोन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. २०१७ ला झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत ही त्यांनी प्रभाग क्रमांक २३ मधून व त्यांची कन्या प्राजक्ता सावंत – विश्वासराव या प्रभाग क्रमांक २४ मधून उमेदवारी मिळवली होती. मात्र दोघांनाही या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता.