मुंबई : आजचा भारत बंद मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात १००% यशस्वी झालेला आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केलेल्या या बंदला संपूर्ण देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, आमदार नसीम खान आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी उपस्थित होते.
चव्हाण यावेळेस म्हणाले की, देशातील व्यापारी वर्ग स्वतःहून आपले व्यवसाय बंद ठेऊन बंदमध्ये सहभागी झाला होता. आज भाजप सरकार घाबरलेले आहे. आजचा भारत बंद दडपशाही करून बंद पाडण्याचा आज सरकारने प्रयत्न केला. पण सरकारच्या दडपशाहीला न जुमानता कोणत्याही हिंसेशिवाय काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी हा बंद यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळेच आज भारत बंदला मोठे यश मिळाले आहे. शिवसेनेने देखील या बंद मध्ये सहभागी व्हायला हवे होते. पण त्यांना सत्ता सोडवत नाही. डरकाळी फोडणारा वाघ आज भुंकायला लागला आहे. हे सरकार जनतेच्या हिताचे नाही आहे आणि म्हणून हे सरकार गेलेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
संजय निरुपम म्हणाले की, आजचा भारत बंद मुंबई मध्ये कोणत्याही हिंसेशिवाय १००% यशस्वी झाला. आज हे सिद्ध झाले आहे आणि लोकांनाही कळले आहे की, फक्त शिवसेनाच नाही तर काँग्रेस देखील मुंबई बंद करू शकते. विशेष म्हणजे या बंदला कुठेही हिंसक वळण लागले नाही. काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याने या बंदमध्ये हिंसा केली नाही.
ते पुढे म्हाणाले की, आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत विधान केले की इंधन दरवाढ कमी करणे आमच्या हातात नाही, हे अनाकलनीय आहे. मी म्हणतो की हे भाजप सरकारच्याच हातात आहे. कारण आज केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून जे भरमसाट कर लावले जातात. त्यामुळे पेट्रोल आणि डीझेल महाग झालेले आहे. जर हे कर कमी केले तर पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा कमी होतील. नरेंद्र मोदी सरकार चालवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. जर पेट्रोल आणि डिझेलचे दर ते कमी करू शकत नाही तर ते सरकार काय चालवणार? पेट्रोल आणि डीझेल चे वाढते दर हे देशासाठी एक मोठे संकट आहे. राजस्थान मध्ये निवडणुका तोंडावर आहेत म्हणून वसुंधरा राजेंनी तिथे पेट्रोल डिझेलवरील वॅट चार रुपयांनी कमी केला. जर वसुंधरा राजे हे करू शकतात तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते का करू शकत नाहीत. दर कमी करण्यासाठी ते निवडणुकांची वाट पहात आहेत का? राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅस चे दर लवकरात लवकर ४३% टक्क्यांनी कपात करावी अशी आमची मागणी आहे.
ते म्हणाले की, शिवसेनेबद्दल सांगायला गेले तर, शिवसेना जर म्हणत असेल की आजचा बंद यशस्वी झाला नाही, माझे त्यांना सांगणे आहे की, आज शिवसेना भवनच्या खालची दुकाने सुद्धा बंद होती. शिवसेना सत्तेसाठी लाचार झालेली आहे. ती सत्ता सोडू शकत नाही. पेट्रोल-डीझेल दरवाढीसाठी जितकी भाजप जबाबदार आहे, तितकीच जबाबदार शिवसेना देखील आहे. शिवसेना आज उघडी पडली आहे. भाजप विरोधात फक्त होर्डींग्स लाऊन जनतेची सहानुभूती मिळवणे एवढेच त्यांना माहित आहे. जर त्यांना खरोखरच सर्वसामान्य जनतेची कळकळ आहे, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे आणि सरकारविरोधात उभे राहावे.