रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेल्या योगपटू आर्या उदय तांबे हिला जाहीर झाला आहे. येत्या 24 जूनला दुपारी 3.30 वाजता कर्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
राणी लक्ष्मीबाईंच्या 160 व्या पुण्यस्मरणानिमित्त आर्याचा सत्कार केला जाणार आहे. आर्या तांबे चिपळुणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकते. वयाच्या पाचव्या वर्षांपासून पाग व्यायामशाते ती योगासनांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेत आहे. यापूर्वी तिला सलग दोन वर्षे मुंबई महापौर योगासन स्पर्धेत सुवर्णपदक, शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला सांघिक सुवर्णपदक पटकावले. रांची-झारखंड येथे फेडरेशन राष्ट्रीय योगासन स्पर्धेत कास्यपदक मिळवले. सातव्या वर्षी आशियाई योगासन स्पर्धेत तिची निवड झाली. यात तिने योगामध्ये सुवर्णपदक व र्हिदमिक योगामध्ये रौप्यपदक व आर्टिस्टिक योगामध्ये कास्यपदक अशी तीन पदके भारताला मिळवून दिली. महाराष्ट्र योग परिषदेतर्फे आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत तिने द्वितीय क्रमांक व महर्षी पतंजली राज्यस्तरीय योग पुरस्कार मिळवला आहे.
विवाहाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या निमंत्रित दांपत्यांचे सत्कारही या कार्यक्रमात होणार आहेत. तसेच 1857 चे स्वातंत्र्यसमर- एक महाअध्याय यावर ठाण्यातील उदय सप्रे व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, सचिव सौ मृणाल टिकेकर यांनी केले आहे.