मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी अरुण दाते यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या भावगीतांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकाच्या निधनाने त्यांच्या चाहते भावूक झाले आहेत. अरूण दाते यांच्या गाण्याच्या चाहत्यांची संख्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, तेवढी त्यांच्या चाहत्यांची देखील आहे. अरुण दाते यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावली होती. अरुण दाते सध्या मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहत होते. मुंबईतील कांजुरमार्गमधील निवासस्थानी रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात श्री.दाते यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाचा साज ल्यालेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः ‘..भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत. त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे.