रोहिदास जाधव, (लेखक विद्यार्थी चळवळीत कार्यरत आहेत)
“जगातील डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचा आयकॉन. जन्म अर्जेंटिनातला, संपूर्ण दक्षिण अमेरिका खंड मोटारसायकलवरून फिरणारा, क्युबन क्रांतीचा एक महत्त्वाचा नायक, त्यानंतर बोलिव्हियामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करणारा एक खराखुरा क्रांतिकारक. जगात जिथे जिथे अन्याय होईल, तिथे तिथे जाऊन लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारे कॉम्रेड अर्नेस्टो चे गव्हेरा नक्कीच सर्व देशांच्या सीमा ओलांडून जागतिक पातळीवरील तमाम तरुणांचा आदर्श बनण्यावाचून कसा राहील.”
अर्नेस्टो चे गव्हेरा हे क्युबन क्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचे पुढारी, लढाऊ सेनापती, खुपच प्रभावी क्रांतिकारक होते. कारण ते जन्मले अर्जेंटिनामध्ये, क्रांतिकार्य केले क्युबात आणि तेच कार्य करताना शहीद झाले बोलिव्हियात. म्हणूनच तर ‘चे’ यांच्याबद्दल जागतिक पातळीवर एक वेगळेच आकर्षण आहे. १४ जून, १९२८ रोजी अर्जेंटिनामधील रोसरिओ येथे ‘चे’ यांचा जन्म झाला. ‘चे’ हे आपले वैद्यकीय शिक्षण सुरू असताना डिसेंबर १९५१ मध्ये अल्बर्टो या मित्रासोबत मोटारसायकलवरून दक्षिण अमेरिका खंड फिरायला गेले. चिली, पेरु, लटेशिया, कोलंबिया, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, अर्जेंटिना या देशात फिरले. आगस्ट १९५२ मध्ये ‘चे’ परतले आणि जोरदार अभ्यास करून मार्च १९५३ मध्ये डॉक्टर बनले. त्यानंतर करकास येथील कुष्ठधाम ‘चे’ यांना ८०० डॉलर्स महिना पगारावर नोकरी द्यायला तयार होते. परंतु ‘चे’ यांनी तसे केले नाही.
‘चे’ यांनी शिक्षण घेतानाच मार्क्सवादी पुस्तके वाचली होती. दक्षिण अमेरिकेतील प्रवासात त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे भयानक दारिद्र्य व मागासलेपणा अगदी जवळून अनुभवले होते. या सर्व परिस्थितीला परदेशी मक्तेदार, अमेरिकन साम्राज्यवाद कारणीभूत आहे. हे त्यांना स्पष्ट झाले होते. गुलामीच्या बेड्या उखडून टाकण्यासाठी, साम्राज्यवादाला पराभूत करून पिचलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे केवळ क्रांती.’चे’ यांना हे स्पष्ट समजले होते. वंचितांना खरे जीवन मिळवून देणे, मानवी कल्याणासाठी कार्य करणे हे एक जगप्रसिद्ध संशोधक किंवा विख्यात डॉक्टर बनणे यापेक्षा किंचितही कमी नाही. याबद्दल ‘चे’ यांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती.
शिक्षण संपल्यावर ‘चे’ यांनी काही दिवस बोलिव्हिया आणि ग्वाटेमाला देशात कार्य केले. हे कार्य सुरू असतानाच जून १९५५ मध्ये ‘चे’ यांची राउल कास्ट्रो यांच्याशी भेट झाली. याच दरम्यान फिडेल कास्ट्रो अमेरिकेत आपल्या क्युबन देशबांधवांकडून क्रांतिकार्यासाठी मदत जमा करीत होते. जुलै १९५५ मध्ये मेक्सिकोत फिडेल कास्ट्रो यांच्याशी ‘चे’ यांची भेट राउल कास्ट्रो यांनी करून दिली. त्यांच्यात आगामी योजनांची व राजकीय विषयांवर चर्चा झाली.
मदत जमा केल्यानंतर नोव्हेंबर १९५६ मध्ये ‘ग्रान्मा’ने क्रांतिकारक क्युबाकडे रवाना झाले. त्या बोटीची क्षमता केवळ १२ होती, त्यात ८० पेक्षा अधिक माणसं बसली होती. बोटीला क्युबाच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. प्रवासात असताना अचानक बोटीत पाणी शिरले. क्रांतिकारकांना खूप कमी अन्नावर जगावे लागले. एकावेळी तर सडकी संत्री केवळ शिल्लक राहिली होती. त्याचवेळी ‘चे’ यांच्या दम्याच्या आजाराने जोर धरला होता. तरी देखील तशाही परिस्थितीत ‘चे’ क्रांतिकारकांमध्ये उत्साह वाढवित होते. बोट अचानकच किनाऱ्यापासून काही अंतरावरच थांबली. क्रांतिकारकांना पुरेशी हत्यारं आणि थोडेसे अन्न याशिवाय गळ्यापर्यंत पाण्यातून जाताना काही सोबत घेता आले नाही. ‘ग्रान्मा’ असताना हुकुमशाह बटिस्टाच्या विमानांनी तिला हेरले होते. पाण्यातून मार्ग काढताना क्रांतिकारकांवर गोळीबार सुरू झाला. क्रांतिकारक विमानांना चुकवत पुढे सरकत होते. त्यादिवशी संपूर्ण रात्र क्रांतिकारकांना ऊसाच्या मळ्यातून चालावे लागले होते. ऊस खाऊन ते भूक मिटवत होते. एका कारखान्याच्या परिसरात क्रांतिकारक विश्रांती करतानाच त्यांच्यावर पुन्हा गोळीबार सुरू झाला. बराच वेळ चकमक उडाली. आडोसा घेण्यासाठी ‘चे’सह क्रांतिकारक ऊसाच्या मळ्यात शिरले. विमाने गेल्यानंतर क्रांतिकारक पुढे सरकले आणि मागे वळून पाहिले तर त्याच ऊसाच्या मळ्याला आगीने घेरले होते. त्यानंतर अनेक लढाया झाल्या. त्या प्रत्येक लढाईमध्ये ‘चे’ आघाडीवर असत. पहिल्याच लढाईत बटिस्टाच्या सैन्याचे क्रांतिकारकांनी पराभव केल्याने ते पार खचून गेले होते.
क्युबातील सिएरा मिस्रा डोंगर परिसरात क्रांतिकारकांनी आपले तळ ठोकले होते. क्रांतिकारकांना गनिमी युद्ध व राजकीय शिक्षण देण्याची मुख्य जबाबदारी ‘चे’ यांच्याकडे होती. क्युबातील वेगवेगळ्या भागात असे ठिकाण क्रांतिकारकांनी बनवले होते. याचदरम्यान शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचा पाठिंबा क्रांतिकारकांना मिळत होता. त्यांच्यातले काही जण प्रत्यक्ष लढ्यात सामील होत होते. जनतेने क्रांतिकारकांना अन्न पुरवूनही भरपूर मदत केली.
१९५८ च्या आगस्टमध्ये फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा यांनी एक सार्वत्रिक योजना आखली. अर्थातच क्युबन कम्युनिस्ट पक्षही यामध्ये सामील होता. क्युबन जनता बटिस्टाच्या जुलुमाला प्रचंड कंटाळली होती. दडपशाही, भ्रष्टाचार, अराजक यांना पार कंटाळलेल्या जनतेमध्ये हुकुमशाह बटिस्टाविरोधी भयंकर चीड निर्माण झालेली होती. क्युबाला केवळ लुटण्याशिवाय बटिस्टाने काही केले नाही. अमेरिका हुकुमशाह बटिस्टाला पूर्ण सहकार्य करत होती. लढाईसाठी लागणारी सर्व हत्यारं, शस्त्रास्त्रे बटिस्टाकडे होती, परंतु ती कुशलपणे वापरणाऱ्यांचा अभाव होता. १९५८ आगस्टच्या शेवटी लढाईच्या सर्व सूचना क्रांतिकारकांना देण्यात आल्या. फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो व इतर नेत्यांच्या नेतृत्त्वात क्युबातील विविध भागात प्रत्यक्ष लढाई करायला क्रांतिकारक पूर्णपणे तयार होते. सर्व नियोजन झाल्यानंतर क्रांतिकारकांनी क्युबातील अनेक ठिकाणी लढाया करून त्या त्या भागावर ताबा मिळवला. लढाई जिंकत जिंकत क्रांतिकारक हवानाकडे जात होते. त्याचवेळी जनतेने बटिस्टा सरकारला कर भरणे बंद केले. कामगार संपावर गेले. फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो व इतर सर्वच क्रांतिकारकांचे जनता तुफानी स्वागत करत होती. त्यांचा जयजयकार करून क्रांतीला समर्थन दर्शवत होती. परिस्थिती क्रांतिकारकांसाठी अनुकूल बनत होती. काही ठिकाणी तर बटिस्टाचे सैन्य लढाई सुरू होण्याआधीच शरण आले. बरीच शहरे, गावं विविध ठिकाणी क्रांतिकारकांनी ताब्यात घेतले. क्रांतिकारकांनी बटिस्टाची हजारो सैन्य, मशीनगन्स, लढाऊ विमान, दारूगोळा आणि महत्त्वाचे अधिकारी कैद केले होते. आता जे अधिकारी आणि सैन्य बटिस्टाकडे होते, त्यांचा तर फिडेल कास्ट्रो आणि चे गव्हेरा यांचे फक्त नाव जरी ऐकले तरी थरकाप उडत होता. त्यामुळे शेवटी – शेवटी तर बटिस्टाच्या सैन्यात बटिस्टासाठी लढण्याची इच्छाच उरली नव्हती. १९५८ च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी क्रांतिकारकांना अनेकदा संघर्ष करावा लागला. सर्व लढाया क्रांतिकारक जिंकत होते. क्रांतिकारकांना अंतिम विजय प्राप्त होण्याआधीच ३१ डिसेंबर १९५८ च्या रात्री हुकुमशाह बटिस्टा क्युबा सोडून पळून गेला. पराभव जवळच दिसल्याने त्याने आपले सामान गुंडाळले. ही बातमी वाऱ्यासारखी क्युबात पसरली. बटिस्टाचे उर्वरित अधिकारी आणि सैन्य यांना आता शरण पत्करल्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता, झाले देखील तसेच.
१९५९ च्या नववर्षाने क्युबन क्रांतीचे जंगी स्वागत झाले. क्रातीचे नेते फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो आणि त्यांचे सर्व क्रांतिकारक सहकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. क्रांती यशस्वी झाली. क्रांतीनंतर फिडेल कास्ट्रो हे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष बनले तर चे गव्हेरा यांच्याकडे संरक्षण, लष्कर, अर्थ, उद्योग ही खाती तसेच क्युबन राष्ट्रीय बँकेचे संचालक, आर्थिक सल्लागार, नियोजन मंडळ या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. चे गव्हेरा हे क्युबन कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळातही होते. क्रांती झाली तेंव्हा ‘चे’ यांचे वय केवळ ३० वर्षे तर फिडेल कास्ट्रो हे ३२ वर्षांचे तरूण होते.
क्रांतीनंतरही ‘चे’ यांच्यात असलेली क्रांतिकारक ऊर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. क्युबन क्रांतीने संपूर्ण दक्षिण अमेरिकेत एक नवचैतन्य निर्माण केले होते. १९६५ मध्ये ‘चे’ यांनी क्युबा सोडला. तेथून गेल्यावर सुरूवातीला कांगो देशात कार्य केले. त्यानंतर बोलिव्हियामध्ये अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने गेले. बोलिव्हियामध्ये ‘चे’ यांनी क्रांतिकारकांची टीम उभारली. काही क्युबन क्रांतिकारक त्यांच्यासोबत होते. बोलिव्हियात ‘चे’ यांना खूप संघर्ष करावा लागला. कारण तेथील जनता क्रांतिकारकांना परकीय समजत होती आणि त्यामुळे सहकार्य करत नव्हती. बोलिव्हियातही ‘चे’ यांनी क्रांतिकारकांना प्रशिक्षण देणारे केंद्र उभारले. त्यांना राजकीय शिक्षण दिले. क्युबातही आणि येथेही क्रांतिकारकांना गुरिला म्हणजे गनिमी युद्ध करणारे सैनिक म्हटले जात.
बोलिव्हियात ‘चे’ यांनी क्रांतिकारकांना सोबत घेऊन तेथील जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी खूप प्रयत्न केला, सशस्त्र संघर्ष केला. जंगलात राहून अनेक यातना सहन करत मार्गक्रमण केले. क्रांतिकार्य सुरळीत सुरू होते, तेंव्हाच शत्रूंना क्रांतिकारकांची माहीती मिळाली. जंगलात शत्रूंनी क्रांतिकारकांवर गोळीबार सुरू केला. काही क्रांतिकारक त्या चकमकीत ठार झाले. ‘बोलिव्हियाची राष्ट्रीय मुक्तिसेना’ प्रमुख ‘चे’ यांना पकडण्यात शत्रूंना यश मिळाले. जंगलातील एका खोलीत ‘चे’ यांना डांबून ठेवले होते. ‘चे’ यांचे हातपाय बांधून साखळदंड टाकून कोंडून ठेवले होते. तरीही ‘चे’ जिवंत होते आणि जिवंत ‘चे’ साम्राज्यवाद्यांना कोणत्याही परिस्थितीत नको होता. म्हणून ‘चे’ यांच्यावर तेथेच ९ आक्टोबर १९६७ या दिवशी गोळ्या झाडल्या गेल्या आणि ‘चे’ यांना ठार करण्यात आले.
‘चे’ यांनी ‘गुरिला वारफेअर’ या जगप्रसिद्ध पुस्तकाला जन्म दिला. त्यांनी लिहिलेली रोजनिशी खुप गाजली. त्यांच्या जीवनावर परदेशात बरेच चित्रपट प्रदर्शित झाले. ‘मोटारसायकल डायरी’ ही त्यापैकीच एक प्रचंड गाजलेली, लोकप्रिय झालेली डाक्युमेंट्री आहे. ‘चे’ यांना आयुष्यभर दम्याचा आजार होता. तरीही त्यावर मात करून त्यांनी प्रचंड मोठे क्रांतिकार्य केले. तरुण क्रांतिकारक काय करू शकतात, याचे सर्वोत्तम उदाहरण ‘चे’ हे आहे. भरपूर अभ्यास करून प्रत्यक्ष कृती करणारे ‘चे’ हे एक झंझावात आहे. जगात कोठेही अन्याय होत असेल, तर त्या अन्यायाविरोधात लढणारा प्रत्येक जण माझा कॉम्रेड बनतो, असे’चे’ मानत. म्हणूनच ‘चे’ हे आज जगातील कानाकोपऱ्यातील हजारो नव्हे तर करोडो तरुणांच्या मनावर राज्य करत आहेत. आज जगभरात सुरू असलेल्या अन्याय विरोधातील डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीच्या प्रत्येक संघर्षातील आयकॉन आहे आणि या पुढेही चिरकाल राहील. ‘चे’ यांना आज त्यांच्या स्मृतीदिनी क्रांतीकारी अभिवादन. कॉम्रेड अर्नेस्टो चे गव्हेरा अमर रहे…..!