मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : पहाटे चार वाजता शौचालयातून परिसरात रडण्याचा आवाज येतोय. आवाज मांजरीच्या पिल्लासारखा वाटल्याने रहिवाशांचे दुर्लक्ष होते. काही वेळाने एक महिला रहिवासी शौचालयात जाते. तिच्यासमोर मन अस्वस्थ करणारे दृश्य दिसते. शौचकूपात काही तासांपूर्वी जन्मलेले एक अर्भक पडलेले असते. आर्त स्वरात ते बाळ रडत असते. बाजूलाच त्याची नाळ पडलेली.
हे दृश्य पाहून ती महिला हेलावते. तातडीने परीसरातील नागरिकांना बोलावते. धावाधाव होऊन त्या अर्भकाचे प्राण वाचविले जातात. एखाद्या कथानकात रचली जावी, अशी ही घटना शुक्रवारी पहाटे कांजूरमार्ग येथे घडली.
हनुमान गल्लीतील सार्वजनिक शौचालयामध्ये स्त्री जातीचे अर्भक सापडले. रहिवांशांच्या सतर्कतेमुळे हे बाळ मृत्यूच्या दाढेतून बचावले. आता बाळाची प्रकृती उत्तम असून शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे पाचच्या सुमारास येथील महिला शौचालयात गेली. रडण्याचा आवाज येऊ लागला. जवळ जाऊन बघितले एक बाळ शौचालयात पडलेले दिसले. यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी विलंब न करता पोलीस कंट्रोलला कळवले. पोलिसांनी येऊन बाळाला विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालयात दाखल केले. पुरेशा सुविधा नसल्याने शिव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.
कांजूर पोलीस ठाण्यामध्ये मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्या पोलीस ठाण्याकडून बाळाला कपडे देण्यात आले. दोन महिला पोलीस बाळाजवळ ठेवण्यात आले आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बाळाला कांजूरमार्ग येथील वात्सल्य ट्रस्ट येथे ठेवण्यात येईल, अशी माहिती कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजीनाथ सातपुते यांनी दिली.
——–
पहाटेपासून रडण्याचा आवाज येत होता. पण सुरुवातीला मांजरीच्या पिल्लु असावा अस वाटले, पण जेव्हा जवळ गेलो तेव्हा बघून थरकाप उडाला. अर्भक शौचालयात रडत पडले होते. आजूबाजूला घुशी कुत्रे फिरत होते. पण कोणीही बाळाला काही केले नाही ही निसर्गाची कृपा आहे. बाळाला काही झालं नाही हे ऐकून खूप बरे वाटले. आम्ही तिला भेटायला जाणार आहे
– स्थानिक रहिवाशी