नवी दिल्ली : ‘अप्सरा’ ही आशियातली पहिली संशोधन अणुभट्टी ऑगस्ट 1956 मध्ये ट्रॉम्बे येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात कार्यान्वित झाली होती. पाच दशकांहून अधिक काळाच्या अविरत सेवेनंतर 2009 मध्ये ती बंद करण्यात आली. अप्सरा अस्तित्वात आल्यापासूनच्या सुमारे 62 वर्षांनंतर जलतरण तलावासारखी अधिक क्षमता असलेली संशोधन अणुभट्टी ‘अप्सरा-अपग्रेडेड’ ट्रॉम्बे येथे 10 सप्टेंबर 2018 रोजी संध्याकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी अस्तित्वात आली. अणुभट्टी स्वदेशी बनावटीची असून एलईयूपासून होणाऱ्या चकतीसारख्या डिस्पर्जन इंधन घटकाचा वापर करते. वैद्यकीय उपाययोजनासाठी रेडिओ आयसोटोप्स, अणुभौतिकशास्त्र, भौतिक विज्ञान आणि विकिरण संरक्षण यातील संशोधनासाठी या अणुभट्टीचा उपयोग होईल.