मुंबई, ०२ फेब्रु. : भारताच्या पारंपरिक खो-खो खेळात नव्हे, तर संघात्मक पातळीवर बदल करण्याचे पाऊल भारतीय खो-खो महासंघाने उचलले आहे. त्यानुसार आता नव्या मोसमापासून किशोर-किशोरी, कुमार-कुमारी आणि पुरुष, महिला अशा सर्व संघात १२ ऐवजी १५ खेळाडू घेण्यास मान्यता दिली आहे. यासाठी फेडरेशनचे सहसचिव आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी विशेष प्रयत्न केले होते. याची अंमलबजावणी एप्रिल २०२२ नंतर होणार्या स्पर्धांमध्ये करण्यात येणार असल्याचे पत्र खो-खो फेडरेशनतर्फे सर्व राज्य संघाना काढण्यात आले आहे.
खो-खो खेळामध्ये जसा वेग आहे, तसा धोकाही अधिक आहे. खेळाडू जखमी होण्याचे प्रमाणही तसेच अधिक आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक खेळाडू जखमी झाल्यास पूर्वीच्या १२ खेळाडूंच्या संघरचनेत प्रशिक्षकांसमोर बदली खेळाडूंचे पर्याय कमी असायचे. थोडक्यात राखीव खेळाडूंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय खो-खो महासंघाच्या दोन महिन्यापूर्वी झालेल्या वार्षिक सभेत चंद्रजीत जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर विचार विनिमय आणि संलग्न संस्थांची मान्यता घेऊन या बदलाची माहिती भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने सर्व सलंग्न संघटनांना कळविण्यात आली.
या निर्णयामुळे आता खो-खोचा संघ १९ जणांचा राहिल. यात १५ खेळाडू (नऊ खेळणारे आणि सहा राखीव), प्रशिक्षक, व्यवस्थापक, ट्रेनर आणि सपोर्ट स्टाफ अशी संघरचना असेल. महासंघाने केवळ खेळाडूंची संख्या वाढवली आहे. खेळाच्या नियमात आणि खेळण्याच्या पद्धतीत कुठलाही बदल केलेला नाही. खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सचिव डॉ. चंद्रजित जाधव यांनी खो-खो संघांतील खेळाडूंची संख्या वाढविण्यासंदर्भात काही महिन्यांपुर्वी फेडरेशनला पत्र दिले होते. हा बदल का आवश्यक आहे, याबाबत फेडरेशनच्या पदाधिकार्यांनाही पटवून दिले होते. हे मंजूर करवून घेण्यासाठीही डॉ. जाधव यांनी प्रयत्न केले.
त्याला यश आले असून फेडरेशनचे सचिव एम. एस. त्यागी यांचे पत्र नुकतेच सर्व राज्य असोसिएशनला पाठविले आहे. खो-खोच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यानुसार राज्य संघाकडूनही सकारात्मक बदलही होत आहेत. यामधून खो-खो खेळाची प्रगती होत आहे. खेळाची परिणामकारकता वाढविण्यासाठी फेडरेशनकडून संघातील खेळाडूंची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रात नमुद केले आहे. याची अंमलबजावणी एप्रिल 2022 नंतर होणार्या स्पर्धांमध्ये करण्यात येणार आहे.
खो-खोच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजिवराजे निंबाळकर, फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, सचिव अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले खजिनदार अॅड अरुण देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी फेडरेशनचे सुधांशू मित्तल, सचिव एम. एस. त्यागी यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत राज्याचे सचिव अॅड. शर्मा म्हणाले की, खेळाडूंसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. दुखापतीवेळी राखीव खेळाडूंची गरज भासते. त्यामुळे संघाला मोठा आधार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर पोचलेल्या खो-खो ला अशाप्रकारच्या निर्णयांमुळे निश्चितच उभारी मिळेल.















