मुंबई, विशेष प्रतिनिधी : जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रसार माध्यम प्रतिनिधी, शाळा, उद्योग, अशासकीय संघटना अशा घटकांकडून विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2020’ करीता 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जनजागृती होणे देखील आवश्यक आहे. म्हणून विविध क्षेत्रात जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार सन 2018 पासून देण्यात येतो. त्यानुसार यावर्षी 3 रा राष्ट्रीय जल पुरस्कार, 2020 विविध श्रेण्यांमध्ये देण्याचे प्रस्तावित आहे. यात उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपरिषद, ग्रामपंचायत, शाळा, मोठे, मध्यम व लघु उद्योग, जल नियमन प्राधिकरण, जल योद्धा, अशासकीय संघटना, पाणी वापर संस्था, दूरचित्रवाहिनी कार्यक्रम, हिंदी/ मराठी/ इंग्रजी वर्तमानपत्र, अशा एकुण 11 श्रेणींमध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती/ संस्था/ कंपनी यांनी परिपूर्ण नामांकने/ प्रस्ताव/ दि. 10 फेब्रुवारी, 2021 रोजीपर्यंत https://mygov.in या वेबसाईटवर किंवा nationalwaterawards@gmail.com या ई-मेल वर केवळ ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन र.ग.पराते, उपसचिव, लाक्षेवि (आस्था), जलसंपदा विभाग, मंत्रालय, यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनाकरिता 022-22023096 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.