रत्नागिरी (आरकेजी): मुंबई गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारा डंपर लांजा येथे पलटी झाला. झाडाला धडक दिल्याने हा अपघात झाला असून यात १ जण जागीच ठार झाला. तर १७ जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. लांजा पासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या बागेश्री या ठिकाणी हा अपघात झाला.
लांजातून राजापुरला कामगारांना घेऊन जाणारा एमएच ०८- एच १९६२ हा डंपर चालक भरधाव वेगाने घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघाताची भीषणता एवढी होती कि महामार्गालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला डंपरची धडक बसताच झाड जमीनदोस्त होऊन डंपर दरी मध्ये कोसळला. या अपघातात मुकादम शिवाप्पा पवार, हा जागीच ठार झाला आहे. तर रेणुका इप्परंगी, मीनल मुद्यवार, महादेवी इप्परंगी, विमला इप्परंगी ,शारदा सिरदोसी सुमित्रा वडार, ज्योती गडेकरे, परशु गडेकरे, संजना आरगेर, चनाप्पा आरगेर, सददुदेवी कालिकोई, रंजना मुद्देवार, रेणुका आलूर, सत्या मुद्देवार, रेवती मुद्देवार, परशुराम कालिकोई असे १६ जण गंभीर जखमी झाले. हे सर्व जण कर्नाटक राज्यातील कामगार असून या ठिकाणी एका ठेकेदाराकडे कामासाठी जात होते. तर संदीप भोगटे (तळगाव मालवण) हा चालक असे एकूण १७ जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची खबर मिळताच लांजा आणि कुवे येथील अनेक युवकांनी धाडस दाखवून जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तर जखमींवर तातडीने उपचार व्हावेत म्हणून लांजा शहरातील खासगी डॉक्टर देखील मदतीसाठी आले होते. अपघाताचा अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत.