मुंबई : ‘आपलं मंत्रालय’च्या सप्टेंबरच्या अंकाचे प्रकाशन रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे करण्यात आले. या अंकाचे अतिथी संपादक डवले आहेत. यावेळी संचालक अजय अंबेकर, शिवाजी मानकर, संपादक सुरेश वांदिले, कार्यकारी संपादक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.आपलं मंत्रालयचा हा अंक आकर्षक व वाचनीय झाला असल्याचे गौरवोद्गार डवले यांनी काढले. मंत्रालयीन प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने हा अंक आवर्जून वाचावा आणि आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.या अंकात गणेशोत्सव, गौरीचा पारंपरिक खेळ, बैलपोळा याविषयीच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाची काही निवडक छायाचित्रे हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे अनुभव, कथा, कवितांचाही अंकात समावेश करण्यात आला आहे.