मुंबई (मुकेश धावडे) ता.21 : केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तू आणि सेवांवर अन्यायकारी जीएसटी लावून जनतेला वेठीस धरत आहे. वस्तू व सेवा पुरविण्याच्या प्रत्येक टप्प्यात जीएसटी लादली आहे. पूर्वी उत्पादकांवर कर लादला जात होता, परंतू आता वस्तू व सेवांचा उपभोग घेणाऱ्या ग्राहकांवर तो लादला असल्यामुळे सर्व सामान्य माणसांचे कंबरडे मोडले जात आहे. जीएसटी 5 टक्क्यांपासून 28 टक्क्यांपर्यंत अशा विविध टप्प्यात घेतली जाते आहे. ही अन्यायकारी जीएसटी वाढ रद्द करावी या मागणीसाठी मुंबई राष्ट्रवादी पार्टी तर्फे माझगाव येथील जीएसटी कार्यालयावर बुधवार, (ता.20) जुलै रोजी मोठ्या संख्यने मोर्चा काढण्यात आला.
केंद्र सरकारने नुकतीच बिगर बॅन्डेड अन्नधान्य, खाद्यपदार्थ, शालेय शिक्षण सामुग्री त्यात शार्पनर, वही, पेन्सील तसेच कटलरी साहित्य, विद्युत पंप, दुग्धजन्य पदार्थ, गुळ, मध पापड, मांस, मटण, विद्युत उपकरणे, सोलर वॉटर हिटर, स्मशानातील विधी व साहित्य तसेच आरोग्य सेवा सुविधा इत्यादी वस्तूंवर 5 टक्क्यांपासून 18 टक्क्यांपर्यंत वाढवून सामान्यांनी ‘जगावे की मरावे’ अशी द्विधा परिस्थिती निर्माण केली आहे. माणसाला लागणा-या अन्न, वस्त्र, निवारा यावरही हे केंद्र सरकार जीएसटी आकारत असेल, तर न्याय तरी कुणाकडे मागावा? केंद्र सरकार स्मशानातील विधी व साहित्य यावर जीएसटी लावणार असेल तर एखादा गरीब मेला तर त्याने जीएसटी ची तरतूद करुन मरायचे का? मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार झाला नाही का?असा सवाल मोर्चा दरम्यान आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला असून केंद्रातील सरकारने जीएसटी लावल्यानंतरही कित्येक राज्यांची देणी परत केली नाही. उलट करप्रणाली जीएसटी वाढवून जगणेच मुश्किल केले आहे. सर्वसामान्य माणूस फक्त ‘टॅक्स’ भरुन हतबल झाला आहे. केंद्र सरकार याचा कधी विचार करणार आहे का? देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्याचे हे उदाहरण दिसते. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना देखील सोडले नाही. शिक्षण ही विद्यार्थ्यांची पायाभूत गरज असताना शार्पनर, वही पेन्सिल सारख्या वस्तुंवर जीएसटी लावून केंद्र सरकारने देशाची इज्जत वेशीवर टांगल्यासारखी वाटते. मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी या जीएसटी व्याप्तीचा निषेध करीत केंद्र सरकारने सदरहू जीएसटी वाढ त्वरीत रद्द करावी, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. यावेळी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राखी जाधव, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, रमेश परब, मानम व्यंकटेश, अर्शद अमीर, प्रदेश प्रवक्ते क्लाईड कास्टो, संजय तटकरे, महेश तपासे, प्रदेश पदाधिकारी सुनिता शिंदे, भालचंद्र शिरोळे, मुंबई पदाधिकारी बाप्पा सावंत, महेंद्र पानसरे, रुपेश खांडके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.