रत्नागिरी (आरकेजी): कोकणातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधाला स्थानिक, प्रकल्पग्रस्त, जनहक्क सेवा समिती, मच्छिमार, शिवसेना यांनी तीव्र विरोध करून आज जेलभरो आंदोलन केले. अणुऊर्जा प्रकल्प आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात आमदार राजन साळवी यांनी सहभाग घेतला होता.
रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाला सकाळी १० वाजता साखरीनाटे गावातून सुरुवात झाली. जनहक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, शिवसेना आमदार राजन साळवी, मच्छिमार नेते अमजद बोरकर, कॉम्रेड अरुण वेळासकर, अभ्यासक डॉ मंगेश सावंत, सचिन चव्हाण, यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त, मच्छिमार, शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. माडबन येथील सोनारगडगा येथे मोर्चा आल्यानंतर आमदार राजन साळवी, अमजद बोरकर, सत्यजित चव्हाण आदींनी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन केले. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी होऊ न देण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. दरम्यान, अणुऊर्जा हटाव देश बचाव, सर्वांनी गर्जा नको अणुऊर्जा यासारख्या घोषणांनी परिसर गजबजला होता. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आमदार राजन साळवी, अमजद बोरकर, सत्यजित चव्हाण यांचाही यात समावेश होता. दरम्यान शेकडो आंदोलकांना अटक करून कोंबेसाखर इथल्या शाळेत आणण्यात आले. तिथे अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची नोंदणी करून नंतर घरी सोडून देण्यात आले. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू पोलिसांकडून मोठी खबरदारी घेण्यात आली होती. विशेष म्हणजे जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे स्वतः आंदोलनस्थळी हजर होते.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्पाला विरोध आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलन तापल्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलन मागे पडल्याचं चित्र होतं. मात्र आज पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तानी जेलभरो आंदोलन या प्रकल्प विरोधातील आंदोलनाची धार कायम असल्याचं दाखवून दिले. गेली १२ वर्ष या प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात स्थानिक जनता लढा देत आहे, मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे शासन व्यवस्थेला आता पुन्हा जाग करण्यासाठी हे आंदोलन असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.