
रत्नागिरी, 29 may : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत आता तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची चिंता आहे, त्यामुळे उद्या दिनांक 30 मे रोजी दुपारी 12.30 वाजता मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे राज्यातील सर्व विद्यापीठाच्या कुलगुरूंशी अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात VC वरून चर्चा करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. एका व्हिडिओ संदेशाद्वारे सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षांसंदर्भात राज्यात जोरदार चर्चा सुरू आहेत. अनेकांमध्ये यामुळे संभ्रमाचं वातावरण आहे. मात्र विद्यार्थ्यांची काळजी तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे. याचसंदर्भात आज मुख्यमंत्री आणि माझी सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. या परिस्थितीत लपरीक्षा कशा अडचणीच्या ठरू शकतात याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर बोललो. मुख्यमंत्री या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच राज्यपालांशी देखील याबाबत आपण चर्चा केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परीक्षांसंदर्भातच उद्या दुपारी 12.30 वाजता राज्यातील विद्यापीठांंच्या सर्व कुलगुरूंशी VC द्वारे चर्चा करणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठीच मुख्यमंत्री ही VC घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठेही मनात शंका ठेवू नये. जे विद्यार्थ्यांच्या मनात आहेत, जे विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे त्या पध्दतीचंच मार्गदर्शन मुख्यमंत्री महोदय उद्या कुलगुरू महोदयांना करतील अशी आपल्याला खात्री असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.














