मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : इयत्ता दहावी बोर्डाच्या उत्तर पत्रिका चोरीप्रकरणी दोन जणांना आज अटक करण्यात आली. दहिसर पूर्वेतील घरटनपाडा येथील इस्रा शाळेत तपासणीसाठी ५१६ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासणीसाठी आल्या होत्या. त्यानंतर शाळेने उत्तर पत्रिका चोरी झाल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली होती.
या शाळेतून विज्ञान, संस्कृत, इतिहास अशा तीन विषयांच्या उत्तर पत्रिका चोरीला गेल्या. या घटनेनंतर विद्याथ्याचे शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दहिसर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पवार यांना १५ एप्रिलला याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार दोन संशयिताना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. आरोपींकडून इतिहासाच्या १४९ आणि संस्कृत विषयाच्या १८१ उत्तरपत्रिका हस्तगत केल्या. उर्वरीत १८६ उत्तरपत्रिकांचा तपास सुरू आहे. उत्तर पत्रिका रद्दीत विकुन पैसे कमवण्याच्या आरोपींचा उद्देश असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन झाले आहे, असे परिमंडळ १२ चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले