रत्नागिरी दि. ३१ : जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) कायदा २००३, अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चा प्रभावी अमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती व दूध भेसळीस आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली.
यावेळी सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन द.मा.बांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी पी.पी. गुजांळ, तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी समन्वय साधून लिकर/दारुचे नमुने घ्या, तसेच अप्रमाणित नमुन्यांबाबत कारवाई करा आणि त्याचा अहवाल द्या अशा सूचना दिल्या. अन्न आस्थापनाच्या जास्तीत जास्त तपासण्या घेण्यात याव्यात तसेच दूधाचे नमूने जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन विश्र्लेषणाकरिता पाठवावेत असे निर्देश दिले.