श्वासात घुमणारा कबड्डीचा आवाज…ऐटित मांडीवर थोपटली जाणारी विजयाची थाप…आणि वर्चस्वाची सांघिक जिद्द! मराठी मातीतून आंतरराष्ट्रीय मॅटवर गाजत असलेल्या या ‘कबड्डी’ खेळाची ख्याती सर्वत्र पसरत आहे. या खेळाला ग्लॅमर प्राप्त करून देणाऱ्या ‘प्रो कबड्डी’ च्या नव्या हंगामास २८ जुलै ला सुरूवात होत आहे. गेली चार वर्ष मोठ्या जल्लोषात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेचा यंदाचा हंगाम महाराष्ट्रासाठी खूप खास असणार आहे. याचे कारण म्हणजे, महाराष्ट्राचा सुपरस्टार ‘अंकूश चौधरी’ यात यू मुंबा आणि पुणेरी पलटन या दोन संघांचा चेहरा म्हणून स्पर्धेत उतरणार आहे. महाराष्ट्राच्या या दोन्ही संघाचे ब्रँडअँबेसिडरपद भूषवण्यास अंकुश देखील खूप उत्सुक आहे. महाराष्ट्राच्या मातीतून वर आलेल्या या खेळाला प्रो कबड्डी सामन्यामुळे व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या दोन संघाचा प्रतिनिधी म्हणून अंकुश चौधरी या मराठी चेह-याचा विचार होतो, ही सन्मानाची बाब आहे. अंकुशच्या सहभागामुळे महाराष्ट्राच्या कबड्डी प्रेमींसाठी यंदाचा पाचवा हंगाम दुहेरी धम्माल देणारा ठरणार आहे. २८ जुलैपासून सुरु होत असलेल्या या सामन्याचा लाईव्ह थरार स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर तसेच ऑनलाईन हॉटस्टार वर पाहता येईल.