रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरीतल्या भोंदू पाटील बुवाच्या कारनाम्यांची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सध्या हा बुवा पोलीस कोठडीत आहे. मात्र हा बुवा ज्या मठातून आपला कारभार चालवायचा, तो झरेवाडीतील त्याचा मठही सध्या चर्चेत आहे. याच मठाची रविवारी अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी पाहणी केली. पाटील बुवाच्या इथल्या कारनाम्यांविषयी त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली.
28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळालेला रत्नागिरीतला भोंदू पाटील बुवा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गेले दोन दिवस पोलिसांनी त्याच्या मठाची झाडाझडती घेतली. त्यानंतर आज (रविवार) रत्नागिरीत आलेल्या अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनीही झरेवाडीतल्या पाटील बुवाच्या मठाची पाहणी केली. अंनिसचे कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थाना घेवून मुक्ता दाभोलकर यांनी झाडाझडती घेतली. बाबा बसायचा कुठे, त्याचा होम-हवन कुठे व्हायचा याचा संपुर्ण आढावा मुक्ता यांनी यावेळी घेतला. भोंदू पाटील बुवाने थाटलेल्या या मठात कशा पद्धतीने आर्थिक व्यवहार चालत होते याचा आढावाही मुक्ता यांनी घेतला. जवळपास अर्धा तास त्यांनी या मठाची पाहणी केली. तसेच मुक्ता यांनी या मठाचे काही फोटोही काढले.