रत्नागिरी, प्रतिनिधी : मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडला आता अनिल परबांचे रिसाॅर्ट केव्हा पाडणार असा सवाल भाजप नेते माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. सोमय्या यांनी या तोडलेल्या बंगल्याची आज मुरुड येथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचं दापोली तालुक्यातील मुरुड गावातील अनधिकृत बंगला प्रकरण गेले काही दिवस गाजत होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत प्रशासन तसेच केंद्राकडेही तक्रार केली होती. त्यानंतर सोमय्या यांनी गेल्या आठवड्यात या ठिकाणी येऊन प्रशसनलाइशारा दिला होता. आठवडाभरात हे अनधिकृत बांधकाम तोडलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा त्यानी दिला होता. दरम्यान मिलिंद नार्वेकर यांनी हा बंगला तोडण्याचं काम सुरू केलं आहे. त्यानंतर आज भाजप नेते किरिट सोमय्या यांनी या ठिकाणी येऊन पहाणी केली. जवळपास पंधरा मिनिटे मिलिंद नार्वेकर यांच्या घराबाहेर होते.
यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की,
प्रशासनाला मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायचा नव्हता, म्हणून प्रशासनाने मिलिंद नार्वेकर यांना स्वतः बंगला पाडयला सांगितले, असा दावा सोमय्या यांनी यावेळी केला.
दरम्यान आमदार वैभव नाईक यांनी राणे यांच्या बंगल्याबाबत केलेल्या वक्तव्याचा सुद्धा भाजप नेते किरिट सोमय्या यांनी समाचार घेतला.. वैभव नाईक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिमत असेल तर त्यांना हरित लवादामध्ये खटला दाखल करावा असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं.
दरम्यान मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची पहाणी केल्यानंतर किरिट सोमय्या यांनी साई रिसॉर्टची पाहणी केली. हे रिसॉर्ट पालकमंत्री अनिल परब यांचं अनधिकृत रिसाॅर्ट असून मिलिंद नार्वेकर यांचा बंगला गेला, आता नंबर पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसाॅर्टचा नंबर असल्याचं सोमय्या यावेळी म्हणाले. सोमय्या म्हणाले की, अनिल परब यांनी १८ हजार स्केअरफुटचा अनधिकृत रिसाॅर्ट बांधला. ५ कोटी ४१ लाख या रिसाॅर्टला खर्च केला, त्यासाठीचा पैसा कुठून आला त्याची चौकशी आता इन्कम टॅक्सने सुरु केली असल्याचं किरिट सोमय्या यावेळी म्हणाले.














