मुंबई : कांदिवली महावीर नगर परिवर्तन सोसायटीमध्ये राहत असलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल बबन चासकर यांनी कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सोसायटीच्या बाजूला तीन टाकी खत प्रकल्प तयार केला आहे. त्यांची पत्नी सुनिता आणि मुली तेजश्री व ऊर्जिता त्यांना या कामी सहकार्य करत आहेत.
चासकर यांनी 12 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 3 फूट ऊंच टाकी तयार केली. यामध्ये गांडूळ खत व सेंद्रिय खत प्रकल्प सुरु केला आहे. सोसायटीतील लोक दैनंदिन घरातील ओला कचरा जमा करतात. तो कचरा सेंद्रिय खताच्या टाकीत टाकून वरखाली केला जातो. यामुळे महिन्याला जवळपास 500 ते 600 किलो कचरा जमा होतो. हा कचरा आठवड्यातून दोन ते तीन वेळा हलवला जातो. त्यामध्ये सुकलेली पाने, पालापाचोळा टाकण्यात येतात. यामुळे वास अथवा दुर्गंधी येत नाही. दोन ते अडीच महिन्यात कचरा काढून उन्हात सुकवून चाळल्यानंतर उत्तम, दर्जेदार सेंद्रिय खत तयार होते.
गांडूळ खत प्रकल्पामध्ये शेण, आणून ते सुकवितात. उसाच्या रसवाल्यांकडून उसाचा चोथा (चिपाड ) आणि मंदिरातील निर्माल्य आणून गांडूळ खत प्रकल्पात सर्व प्रथम चिपाड टाकतात. त्यावर सुकलेल्या पानांचा थर ,त्यावर सुकलेल्या शेणाचा थर पुन्हा सुकलेली पाने पुन्हा शेणाचा थर अशा प्रकारे प्रत्येकी तीन थर लावून त्यावर पाणी शिंपडून तीन चार दिवसांनी गांडूळे सोडली जातात. जवळपास दोन महिन्यात गांडूळ तसेच सेंद्रिय खत तयार होते असे चासकर यांनी सांगितले
वर्षाला जवळपास दोन ते तीन हजार किलो कचरा कमी करण्यात यामुळे हातभार लागतो. सोसायटीमधून अत्यल्प कचरा बाहेर जातो.
बाजूला फुलझाडे, फळ झाडे आणि भाजीपाला लावला आहे. त्यात या खताचा वापर करतात. कारली, दुधीभोपळा, वांगी, टोमॅटो, मिरच्या , कडीपत्ता, आंबा, मोसंबी, पेरू, अननस पपई तसेच औषधी वनस्पती जसे पानकुटी, कोरफड, कृष्णतुळस, नागिणीची वेल, हळद आणि गावती चहा यांची लागवड केली गेली आहे.
उपचारासाठी वापर
डेंग्यूमुळे प्लेटलेट कमी झाल्यास पपई ची कोवळी पाने खाल्यास प्लेटलेट झपाट्याने वाढतात. पानकुटीची अनुषा पोटी पाने खाल्ल्यास मुतखडा होतं नाही. पेरूची पाने खाल्ल्याने तोंडातील व्रण आणि घशाची खवखव कमी होते. कोरफडमुळे त्वचा टवटवीत व केंस मुलायम होतात.
अनिल चासकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खत प्रकल्प राबवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे