रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून विधान परिषदेवर कोण निवडून जाणार याचा निकाल उद्या लागणार आहे. शिवसेना उमेदवार अॅड. राजीव साबळे की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एकूणच या निवडणुकीतील राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचे पारडे जड असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे.
शिवसेना-भाजप एकत्र सत्तेत असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही सोडत नाही. त्यामुळे साहजिकच विरोधक या गोष्टीचा काही प्रमाणात लाभ उठवताना दिसतात. विधान परिषद निवडणुकितही हीच स्थिती पाहायला मिळाली. कोकण विधान परिषद निवडणुकीत तर भाजपने उघडपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ दिल्याचं रायगडमध्ये पहायला मिळालं. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे शेकाप, काँग्रेस आणि महत्वाचं म्हणजे खासदार नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष उभा होता. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना मात्र एकाकी पडल्याची चर्चा राजकीय गोटात होती. या निवडणुकीत ९४० पैकी शिवसेनेकडे ३०९ मते होती. तर भाजपकडे १४५ मते होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शेकापकडे २७५ मते, स्वाभिमान पक्षाकडे ९१, मनसे १३ आणि उर्वरित- अपक्ष १०७ मते होती. मात्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा दिल्याने राष्ट्रवादीचं पारडे जड झाले होते. त्यातच शेवटच्या क्षणी भाजपची मते सुद्धा आपल्याकडे वळविण्यात सुनील तटकरे यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आकड्यांच्या खेळात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजेच पर्यायाने सुनील तटकरे यांनी बाजी मारल्याचे चित्र दिसत होते.
सोमवारी झालेल्या मतदान प्रक्रियेवेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १०० टक्के मतदान झाले होते. तर रायगडमध्ये ४६९ पैकी ४६७ मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते तर राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या मतमोजणीत शिवसेना राष्ट्रवादीला धोबीपछाड देते कि राष्ट्रवादी काँग्रेस आपली जागा राखण्यात यशस्वी होते हे स्पष्ट होईल.