मुंबई : अनधिकॄत बांधकामांबाबत महापालिका आक्रमक झाली आहे. त्यानुसार पालिका संबंधित पालिका अधिकार्यांनी वरळी, परळ आणि अंधेरी येथे कारवाई केली. ‘वरळी कोळीवाडा’ परिसरातील गोल्फादेवी मंदिराजवळ असणार्या सोनापूर गल्लीतील एका इमारतीतील अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली. त्याचबरोबर परळ परिसरातील गणपतराव कदम मार्ग आणि सेनापती बापट मार्गाच्या जंक्शन जवळील भूखंड क्रमांक ‘परळ डिवीजन सीएस २/१५६’ यावरील इमारतीच्या गच्चीवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम देखील तोडण्यात आले. महापालिकेच्या परिमंडळ – २ चे उपायुक्त आनंद वागराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या जी-दक्षिण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
तसेच ‘के पश्चिम’ विभागातील वर्सेावा गावठाण परिसरात गेल्या काही दिवसात ५ इमारती अनधिकृतपणे बांधण्यात आल्या होत्या. यामध्ये ५ मजली एक इमारत, ४ मजली तीन इमारती व एका २ मजली इमारतीचा समावेश होता. या सर्व अनधिकृत इमारतींना महापालिकेच्या के- पश्चिम विभागाद्वारे नोटिस देण्यात आली होती. परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनात या अनधिकृत इमारतींवर महापालिकेने कारवाई केली. त्यानुसार आजपर्यंत ५ पैकी २ इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत, तर इतर ३ इमारतींवरील कारवाई देखील सुरु आहे, अशी माहिती के-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.