मुंबई : अंधेरी पश्चिम परिसरातील लिंक रोडवरील ‘स्टार बाजार’ समोर रस्त्याच्या कडेला १३ अनधिकृत बांधकामे उद्भवली होती. या बांधकामांपैकी ९ बांधकामे ही दुमजली होती, तर उर्वरित ४ बांधकामे ही एकमजली होती. व्यवसायिक स्वरुपाचा वापर होत असलेल्या या अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूकीस अडथळा होत होता. ही १३ अनधिकृत अतिक्रमणे आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत. यामुळे आता अंधेरी पश्चिम परिसरातील लिंक रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत व गतीमान होण्यास मदत होणार आहे. परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या कारवाईसाठी मुंबई पोलीसांचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले, अशी माहिती ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
महापालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागांतर्गत जुहू, जोगेश्वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशीवरा, वर्सेावा व वर्सेावा समुद्र किनारा इत्यादी परिसरांचा समावेश होतो. याच ‘के पश्चिम’ विभागात असणा-या ‘वांद्रे दहिसर लिंक रोड’ लगतच्या एका पट्ट्यात गेल्या काही वर्षात १३ अनधिकृत बांधकामे उद्भवली होती. या सर्व बांधकामांचा व्यवसायिक स्वरुपाचा वापर होत होता. ही बांधकामे आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या कारवाई प्रसंगी घटनास्थळी मुंबई पोलीस दलाचे १५ कर्मचारी तैनात होते. तर महापालिकेचे २५ कामगार – कर्मचारी – अधिकारी देखील या कारवाईत सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी १ जेसीबी, १ डंपर व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.