मुंबई : अंधेरी परिसरातील २० बेकायदा बांधकामांवर मुंबई महापालिकेने गुरुवारी बुलडोझल फिरवला. सलग दोन दिवस धडक कारवाई करुन १९ व्यवसायिक व जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर मधील वाहनतळाची जागा निष्कासित केली. परिमंडळ – ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.
अंधेरी पश्चिम परिसरात असणाऱ्या जुहू वर्सोवा लिंक रोड व स्वामी विवेकानंद मार्ग यांना जोडणाऱ्या जे. व्ही. एल. आर. विस्तारीत मार्गावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. या बांधकामांमुळे १२० फूट रुंद असणाऱ्या रस्त्याची रुंदी काही ठिकाणी ९० फूटापर्यंत कमी झाली होती. इन्फिनीटी मॉल जवळील परिसरात महापालिकेच्या भूखंडावर काही अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका अधिनियम कलम ३१४ नुसार पालिका कारवाई केली होती. मात्र न्यायालयाद्वारे या बाबत स्थगिती आदेश दिले होते. ही स्थगिती नुकतीच रद्द करण्यात आल्यानंतर पालिकेने कारवाई केली. येथील १९ व्यवसायिक स्वरुपाची अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी वाढण्यास मदत होणार असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.