(संंग्रहीत फोटो) मुंबई: अंधेरी येथील मरोळमधील मेमून मेन्शन इमारतीला बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील २ मुलांसह ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाने दिली. महिनाभरात आगीची तिसरी घटना असून यात आजपर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
अंधेरी मरोळ भोरी कॉलनीतील मेमून मॅन्शन इमारतीमधील कपसी कुटुंबियांच्या घरात आग लागली. सकीना आपासी कपासी (१४), मोहीन अपासी कपासी (१०), तस्लीम अपासी कपासी (४२), दाऊद अली कपासी (८०) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. तर कोठारी कुटुंबातील इब्राहिम कोठारी (५७), सकीना कोठारी (५३), हुसेन कोठारी (२६), हजीफा कोठारी (२१), झारा कटलरीवाला (४२) हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर होली स्पिरिट रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, अग्निशमन दलाने आग पूर्णतः विझवली असून आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे.