मुंबई : चिपळूण तालुक्यातील वारेली हे खेडेगाव समृद्धा बनविण्यासाठी मुंबईतील तरुणांना एकत्र करून त्यांच्यात गावाबद्दल गोडी निर्माण करत त्यांच्याद्वारे गावात रस्ते, नळपाणी योजना, बंधारे, पूल उभारणी यांसारखी अनेक विकसनशील कामे करणार्या समाजसेवक अनंत कदम यांना जय हनुमान सेवा मंडळाच्या वतीने समाज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबईतील जय हनुमान सेवा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळा झाला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून मोलाचे योगदान दिल्याबद्दल अनंत कदम यांना नायगाव येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी जय हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, मंडळाचे सल्लागार दिलीप कदम, सचिव विवेक कदम, सहसचिव निशिकांत कदम, राजेंद्र पवार, विजय कदम, कुणाल कदम आदी उपस्थित होते.
तरुणांमध्ये एकजूट असेल तर कोणतेही काम अशक्य नाही, यासाठी तरुणांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यापुढील काळात तरुणांच्या सहकार्याने अनेक मुलभूत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अनंत कदम म्हणाले.