आगरी-कोळी साहित्यातील लोकसंगीताची जाणकार आणि आपल्या विविध रचनांनी ज्यांनी महाराष्ट्राला लोकसंगीताची ओळख करून दिली. ज्यांनी आपले आयुष्यच लोककलेला वाहिले अशा अनंत पाटील यांचा २६ मार्च हा पुण्यस्मरण दिन. त्यानिमित्त त्यांचा जीवनपरिचय उलगडण्याचा केलेला हा प्रयत्न….
महाराष्ट्र असू दे की सातासमुद्रापार प्रत्येक मराठी घरात ‘सत्यनारायण पुजेच्या वेळी लागणारे ‘ऐका सत्यनारायणाची कथा’, प्रत्येकाला जीवनाचे सार सांगणारं ‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळं देतो रे ईश्वर’ हे भावगीत असो की ‘चल गं सखे पंढरीला’, ‘दींडी चालली’, ‘रंजलो गांजलो’, ‘पाहिला मी डोळा, पंढरीचा सोहळा’, ‘वाट पंढरीची’, तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा, आता तरी देवा मला पावशील का..,* यासारख्या हजारों विठ्ठल अभंगांची साद असो. गणेश वंदना,भारुड, कविता, अभंग, भावगीत, कोळीगीत, लग्नगीत, शोकगीत, बालगीत, समूहगीत, प्रबोधनपरगीत, लावणी, पोवाडा, कव्वाली, गझल, शेरोशायरी अशा असंख्य रचना अनंत पाटील यांनी रचल्या. पुढे अवघा महाराष्ट्र य रचनांच्या प्रेमात अखंड बुडाला. आजही या रचना नव्या पिढिलाही तितक्याच लोकप्रिय आहे.
आगरी समाजात अनंत पाटील जन्म झाला. आगरी-कोळी बोलीभाषेतील त्यांचं साहीत्य अतुलनीय आहे. आद्यदेवी एकवीरा आईवर रचलेल्या गाण्यांचा संग्रह अगणित आहे. एवढंच नाही तर ‘आम्ही कोली दर्याचे राजे हाव’ ,’चिंबोरी हानली बारानची’, ‘आगिनगारी बोलतेय बेगिनगारी’, ‘हातानं भरल्या हिरव्या बांगड्या’, ‘आज कोलीवा-यात’, ‘एकविरा आई माझी सत्वाची माउली’, ‘एकीरा मातोसरी’ यांसारखी मनामनावर राज्य करणारी गीते त्यांनी रचली.
१९८९ साली रचली गेलेली ‘शुभमंगल सावधान’ ही रचना आजही त्या पिढीच्या मनावर राज्य करत आहे. त्याच काळात नाटककार म्हणून त्यांनी लिहीलेले आणि दिग्दर्शित केलेले ‘आई तुझा आर्शीवाद’ हे नाटक अवघ्या महाराष्ट्रभर गाजले. त्यांनी ’अनेक भीमगीते’ लिहून प्रबोधन केले. शिवसेनेसाठी गीत लिहून ते सामना वृत्तपत्राच्या प्रथम पानावर छापून आल्यावर बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावून त्यांचा सत्कार ही केला होता.
महाविद्यालयाच्या क्रिकेट संघात फलंदाज म्हणून खेळताना क्रिकेटमधे करियर करायचे स्वप्न आणि त्या दृष्टीने मुंबई रणजी संघामधे निवडीसाठी प्रयत्न करत असताना फक्त छंद म्हणून इंग्रजीमध्ये कविता करणे त्यानंतर हीचं आवड फॅशन कधी बनली ते त्यांना देखील समजले नाही. कव्वालींच्या स्पर्धांसाठी जुगलबंदी करत भारतभर त्यांनी भ्रमण केले. २००१ साली त्यांना महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले.
आजमितीला त्यांची एकूण ३२ ‘अनंताची अभंग भजने’, ‘अनंताची अभंग गीते’ व ‘कोळीगीते व नृत्यगीते’ या शीर्षकाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. टी सिरिज, एच.एम.व्ही, कृणाल यांसारख्या प्रख्यात ध्वनीकंपन्यांची रेकॅार्ड कॅसेटस् यांचा आकडा सहज सांगता येण्यासारखा नाही. गायक प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, मधुकर पाठक, राणी रुपलता, रंजना शिंदे, शकीला पुनवी, कविता कृष्णमुर्ती, उत्तरा केळकर, साधना सरगम, शकुंतला जाधव, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, जगदीश पाटील, स्वप्निल बांदोडकर यांसारख्या प्रत्येक पिढीतील अनेक मातब्बर गायक-गायिकांनी त्यांनी लिहीलेली गाणी गायली आहेत.
एखादं गाणं ऐकल्यावर पाहील्यावर आपण सहज त्या गाण्याला अभिनय करणा-याची किंवा गायकाची ओळख चिकटवतो पण या सा-या प्रक्रियेत एखाद्या गाण्याची खरी ओळख तो गीतकार किवा कवी असतो.
कोणत्याही स्वरुपाच्या प्रसिध्दीची हाव न बाळगता, सरकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता आपल्या आयुष्यात आपल्याच विश्वात रममाण होऊन, सामाजिक भान राखत जीवन ख-या अर्थाने समृद्ध कसे करायचे हे अनंत पाटील यांनी दाखवून दिले. साहित्यिक, राजकीय वर्तुळात वावरुनदेखील कोणत्याही प्रकारचे हेवेदावे त्यांनी केले नाहीत. त्यांच्या सांगितीक प्रवासात फक्त माणसे जोडली. अहमदाबादला एका जुगलबंदी कार्यक्रमाकरीता गेले असता एका मनोविकृत शाहीराने जेवणाच्या सुट्टीत भाजीतून त्यांना कुंकू टाकले आणि तो प्रयत्न यशस्वी होऊ त्यांचा स्वर जन्मभरासाठी बसला, गायकी बंद झाली परंतु त्यांनी हार न मानता गीताच्या माध्यमातून स्वकर्तुत्वावर खिंड लढवली. आयुष्यभर त्यांनी इतरांच्या जीवनात आनंद निर्माण केला… त्यांच्या स्मृतीस प्रणाम..