रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आज गुहागरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत महायुतीचे उमेदवार असलेले अनंत गीते यांनी जनतेला साष्टांग नमस्कार घातला.
यावेळी गीते म्हणाले की , काही दिवसांपूर्वी मी अलिबाग तालुक्यातील कुसुडे गावात गेलो होतो. सभेला मोठी गर्दी होती. रात्री साडेआठवाजता मी सभेला गेलो. मी बोलण्यास उभा राहिल्यानंतर व्यासपीठाच्या उजव्या बाजुला गोंधळ सुरू झाला. तेव्हा सभेत साप शिरल्याचे जाणवले. त्यामुळे घबराट झाली. सापाला कोणी मारू नका असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. ग्रामस्थांनी सांगितले की हा साप विषारी आहे. त्याने दंश केला तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. तो साप सळसळत स्टेजकडे येत होता. एका कार्यकर्त्यांने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचून काढले. या निवडणुकीत आपल्याला दुसऱ्या सापाला ठेचायचे आहे. गेल्या वेळी तो अर्धमेला झाला होता. यावेळी त्याला कायमचे ठेचायचे असल्याची टीका गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर केली.