मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी दोन वर्षापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिल मधील जागेवर स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र अद्याप स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. सरकार केवळ स्मारक उभारण्याचे आश्वासन देवून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत आहे. ही बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारने स्मारक बांधताना आंबेडकरी समाजाला विश्वासात घेऊन काम करावे अन्यथा आंबेडकरी जनतेच्या विरोधाचा सामना करावा लागेल, असा सूचक इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे. इंदू मिलमधील डॉ. आंबेडकर आणि भगवान बुद्धांच्या मूर्त्यांना अभिवादन केल्या नंतर ते आंबेडकरी जनतेला संबोधित करत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ६ डिसेंबर २०११ ला इंदू मिलवर आंबेडकरी समाजाने कब्जा केला होता. यावेळी २४ दिवसाच्या आंदोलनानंतर सरकारने इंदूमिलच्या जमिनीवर आंबेडकर स्मारक बनवण्याचे सरकारने जाहीर केले. त्यानंतर सरकार बदलले आणि २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, सहा महिन्यात काम सुरु करण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र दोन वर्षानंतर ही अद्याप स्मारकाचे काम सुरु झालेलं नाही. बाबासाहेबांचे स्मारक उभे राहावे म्हणून आंबेडकरी समाजातील काही संघटनांनी आंदोलने करत आहेत. तरीही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेत आंबेडकरी संघटनांना विश्वासात घेतले जात नाही असा आरोप आनंदराज यांनी केला. तसेच सरकारला आंबेडकर स्मारक बांधायचे नसल्यास इंदू मिलची जमीन आंबेडकरी जनतेच्या नावे करावी, आंबेडकरी जनता स्वतःच्या खर्चाने स्मारक उभारेल, असे आनंदराज यांनी सांगितले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना माणूस म्हणू जगण्याचा अधिकार दिला आहे. बाबासाहेबांनी लोकांना संकल्प दिला आहे. लोकांना विचार दिले आहेत. यामुळे बाबासाहेबांचे स्मारक त्या तोडीचे व्हावे. या स्मारकामधून लोक चांगले विचार घेऊन बाहेर पडले पाहिजे असे स्मारक लवकरात लवकर उभारले जावे, अशी मागणी केली. तर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी बाबासाहेबांचे विचार या स्मारकामधून मिळाले पाहिजे. सरकारने स्मारकासाठी टेंडर काढले आहे. त्यासाठी २० टक्के अधिकची एकानेच बोली लावली आहे. यामुळे सरकारने याबबाबत लवकरात लवकर स्मारकाबाबत निर्णय घ्यावा सारे आवाहन त्यांनी केले. सरकारने स्मारक बांधण्याचे वचन दिले होते. या वचनाची आठवण करून देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आमच्यावर आंदोलनाची वेळ आणू नका असा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला. यावेळी राजू वाघमारे, विरोधी पक्ष नेते रवी राजा, रिपब्लिकन सेनेचे रमेश जदहावं इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
स्मारकाच्या नावाने युती सरकारचे राजकारण – सचिन अहिर
दादरच्या इंदु मिल परिसरात डॉ. आंबेडकरांचे भव्य दिव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी बाबासाहेबांच्या तमाम अनुयायांची इच्छा आहे. गेल्या वर्षी महापरिनिर्वाण दिनाच्या चार दिवस अगोदर इंदू मिलमध्ये एमएमआरडीएच्यावतीने पाडकामाला सुरूवात केल्याचा दिखावा केला. भाजपच्या काही स्वयंघोषित आणि अतिउत्साही नेत्यांनी येथे येऊन स्मारकाचे काम सुरू झाल्याचा दावा केला होता. शिवाय, महिन्याभरात स्मारकाच्या कामाला सुरूवात होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र केंद्र आणि राज्य सरकार मात्र त्यांच्या भावनांशी खेळत आहे. स्मारकाच्या मुद्द्याचा केवळ राजकारणासाठी वापर करु घेत आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता तारखा देण्याव्यतिरिक्त या सरकारने काहीच केलेले नाही. लोकांना आश्वासने देत राजकारण करण्यापेक्षा सरकारने स्मारक उभारण्यासाठी खरोखरच काहीतरी हालचाली कराव्यात, असे टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी लगावला. तसेच अोखी चक्रिवादळाची पुर्वकल्पना असतानाही प्रशासनाने पुरेशी खबरदारी न घेतल्याने लाखो भीमसैनिकांना हकनाक झालेल्या त्रासाबद्दल मुंबई महापालिका आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आंबेडकरी जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे मुंबई अध्यक्ष सुनिल शिंदे, राम भाऊ भोसले, महापालिका गटनेत्या राखी जाधव, मनीष दुबे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.