मुंबई : गृहिणींकडे असणार्या पाककौशल्याला व्यावसायिकेतेचे रुप यावे, त्यांनाही घरबसल्या रोजगार प्राप्त व्हावा, या हेतूने अमेरिकेत वास्तव्यास असणार्या समीर पाथरे या तरुणाने गृहिणी आणि बचतगटांसाठी होमफुडीश नावाची वेबसाईट तयार केली आहे. या संकेतस्थळाचे औपचारीक उद्घाटन रविवारी गृहिणी आणि पाककलेत प्रवीण असलेल्या शालिनी साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जयंत दांडेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. कन्नमवार नगरातील गोरखा हॉल येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.http://www.homefoodish.com असे या संकेतस्थळाचे नाव आहे.
या वेबसाईटच्या माध्यमातून गृहिणी, बचत गट यांनी तयार केलेले पदार्थ आणि खरेदीदार यांना एकाच छत्राखाली आणण्याचा प्रयत्न समीर यांनी केला आहे. त्यामुळे एका क्लिकवर देवाणघेवाण होणे सोपे होणार आहे. होमफुडीशची संकल्पना अमेरिकेत घेऊन जाण्याचा समीर यांचा विचार आहे. अनुप साळवी, प्रेरणा कासेकर, प्राजक्ता धोलकीया, दत्ताराम गिरकर यांची सहकार्याने समीर यांनी कामकाजास सुरुवात केली आहे.
कोणाला पुरणपोळी वा केक खायचा असेल तर होमफुडीशवर ते पदार्थ आणि बनवून देणार्या गृहिणींची यादी दिसेल. त्यानुसार संबंधित व्यक्ती ऑर्डर देईल. मिळालेल्या मागणीनुसार खाद्यपदार्थ तयार करून, त्याची खरेदी-विक्री एकाच वेळी एका क्लिकवर शक्य होणार आहे. त्यातून नफाही प्राप्त होईल, अशी संकल्पना होमफुडीश तयार करण्यामागे आहे, असे समीर यांनी सांगितले.
एका मराठी तरुणाने गृहिणींसाठी हे संकेतस्थळ बनविले, याचा गर्व वाटतो. इतकेच नव्हे तर महिला सक्षमीकरण व्हावे, यासाठी त्याने संकेतस्थळाला व्यावसायिक स्वरुप दिले, त्याबद्दल मी त्याला शुभेच्छा देतो. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समीर याने गृहिणींना दिलेली ही भेट आहे, असे गौरवोद्गार दांडेकर यांनी काढले.
संकेतस्थळ सुरू होण्यापूर्वी गृहिणी आणि बचत गटांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी क्रमांक: 8652109090