Mumbai : दिल्ली स्थित अमेरिकन दूतावासाचे कामकाज मंत्री श्री. डॉन हेफ्लीन यांच्यासह दूतावासातील इतर अधिकाऱयांच्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन खात्यास काल (दिनांक १४ ऑक्टोबर २०२१) भेट दिली. कोविड-१९ संसर्ग व्यवस्थापनासाठी महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कामकाजाचे या शिष्टमंडळाने कौतुक केले.
दिल्लीमधील अमेरिकन दूतावासाचे कामकाज मंत्री श्री. डॉन हेफ्लीन यांच्यासह मुंबई स्थित अमेरिकन वाणिज्यिक दूतावासातील व्हिसा प्रमुख श्रीमती कॅथरीन एस्टेस, अमेरिकन नागरिक सुविधा तसेच माहिती प्रमुख श्रीमती झैनाबू विल्यम्स्, अमेरिकन नागरिक सुविधा तसेच माहिती उपप्रमुख श्रीमती ब्रिटॅन ओब्रायन, उप वाणिज्य अधिकारी श्री. टॉम बेबिग्टन, विशेष वाणिज्यिक सेवा तज्ज्ञ श्री. केनेथ डिमेलो या सर्वांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता. महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) श्री. महेश नार्वेकर यांनी या शिष्टमंडळाचे महानगरपालिका मुख्यालयात स्वागत केले.
या भेटीदरम्यान श्री. डॉन हेफ्लीन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची कार्यपद्धती समजून घेतली. विविध आपत्तींमध्ये निरनिराळ्या यंत्रणांचा असलेला सहभाग, विभागीय स्तरावर आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे करण्यात आलेले विकेंद्रीकरण याबाबतची माहिती त्यांनी विस्तृतपणे जाणून घेतली. बृहन्मुंबईत वास्तव्यास असणाऱया अमेरिकन नागरिकांकरीता आणीबाणी परिस्थितीत कोणत्या यंत्रणांशी व कशाप्रकारे संपर्क साधता येईल, मदत यंत्रणा नेमक्या कोण असतील, त्या किती वेळात प्रतिसाद देतील, याची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली.
कोविड १९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांबाबत शिष्टमंडळास माहिती देण्यात आली. मुख्यत्वाने कोविड-१९ रुग्णशय्यांचा डॅशबोर्ड, रुग्णवाहिका, शववाहिनी व्यवस्थापन यासह कोविडचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता लसीकरण वेगाने व्हावे यासाठीर महानगरपालिका करीत असलेली कार्यवाही, बृहन्मुंबईतील विविध दूतावासात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱयांसाठी केलेली विशेष व्यवस्था अशी तपशिलवार माहिती सादर करण्यात आली. कोविड-१९ व्यवस्थापन करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्या नावीन्यपूर्ण योजना आखल्या, त्या सुसूत्रपणे कशा अंमलात आणल्या, याची माहिती श्री. डॉन हेफ्लीन यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांनी दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन तसेच कोविड-१९ साथरोग नियंत्रण व्यवस्थापन यासह एकंदरच संपूर्ण उपाययोजनांमुळे आपण प्रभावित झाल्याचे नमूद करुन श्री. डॉन हेफ्लीन यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचे कौतुक केले.
या भेटीप्रसंगी महानगरपालिकेच्या प्रमुख अधिकारी (आपत्कालीन व्यवस्थापन) श्रीमती रश्मी लोखंडे व अमेरिकन दूतावासचे इतर अधिकारी तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.