मुंबई : भारत आणि अमेरिका लोकशाहीचा पुरस्कार करणारे जगातील मोठे देश आहेत. लोकशाही ही दोन्ही देशातील समान धागा आहे. अमेरिकेच्या 242 व्या स्वातंत्र्यदिनी “नाविन्यपूर्ण संशोधन” ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवण्यात आली असून ती कौतुकास्पद आहे. अमेरिका जेव्हा नवनवे शोध लावते, तेव्हा त्याचा संपूर्ण जगाला फायदा होतो. यापुढेही अमेरिकेने नवनव्या गोष्टींचा शोध घेऊन आणि संपूर्ण जगाला सुखी करावे, असे उद्गार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
राज्यातील अमेरिकन कौन्सिल जनरलच्यावतीने मुंबईमध्ये शुक्रवारी रात्री अमेरिकेचा 242 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. यावेळी कौन्सिल जनरल एडगार्ड कागन हे उपस्थित होते. शोध नाविन्याचा (स्पिरीट ऑफ इनोव्हेशन) ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने भारत-अमेरिका यांच्यातील मैत्रीच्या नातेसंबंधांना अधिक घट्ट करण्यावर भर देण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना देसाई यांनी सर्वप्रथम अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इनोव्हेशन( शोध नाविन्याचा) ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून अमेरिका हा स्वातंत्र्यदिन साजरा करत असून ही संकल्पना वाखण्याजोगी आहे. अमेरिका जेव्हा नवनवे शोध लावते, त्याचा संपूर्ण विश्वाला फायदाच होतो. यापुढेही अमेरिकेने नवनवीन शोध लावून पृथ्वीतलावावरील मानव जातीला सुखी करावे, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली.
यावेळी कागन म्हणाले, मी गेल्या वर्षभरापासून आम्ही सहकटुंब भारतात आहोत. या काळात भारत आणि अमेरिकेतील नातेसंबंध अधिक दृढ झाले आहेत. भारत अमेरिकेचे आर्थिक, राजकीय संबंध कायम असून दोन्ही राष्ट्रातील मैत्रिचे संबंध भविष्यात कायम राहतील. 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून भारत-अमेरिकेचा नातेसंबंध आहेत. यंदा 242 स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. अमेरिका जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे. तर भारत देखील लोकशाही मानणारा सर्वात मोठा देश आहे. दोन्ही देशांनी लोकशाहीची मूल्य जोपासण्यासाठी यापुढे देखील प्रयत्न करण्याची गरज असल्याचे कागन म्हणाले.
या सोहळ्यानिमित्त अमेरिकन जवानांनी संचलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
0 0 0