मुंबई : अत्यावश्यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल ॲपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. गोल्डन हवर सिस्टीम्स प्रा.लि. ‘या कंपनीने बनविलेले ‘Ambulance.run’ हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित ॲप आहे. यावेळी आमदार नरेंद्र पवार, ॲम्ब्युलन्स डॉट रनचे संचालक हेमंत ठाकरे उपस्थित होते.
या ॲपद्वारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने ॲम्ब्युलन्स बुक करु शकतात. काही क्लिकद्वारे आपल्या जवळील ॲम्ब्युलन्स शोधण्यासाठी, बुक करण्यासाठी आणि सद्य स्थिती जाणून घेण्यासाठी हे ॲप वापरकर्त्याला सहाय्य करेल.
वापरकरर्त्याची सद्यस्थिती हेच त्याचे आपत्कालीन किंवा पिक अप लोकेशन गृहीत धरले जाईल. तुमचा मित्रपरिवार आणि कुटुंबाअंतर्गत असलेल्या आपत्कालीन संपर्कासोबत तुमची आपत्कालीन माहिती शेअर केल्यानंतर ते तुमच्या ॲम्ब्युलन्सची सद्यस्थिती जाणून घेतील. हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात सहाय्यक ठरेल असे ॲप लाँच करतेवेळी उपस्थित आमदार नरेंद्र पवार म्हणाले.
गोल्डन हवर सिस्टीम्स प्रा.लि. ही औद्योगिक नीती तथा संवर्धन विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया प्रोग्रामद्वारे आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून शिफारस केलेली कंपनी आहे.
‘Ambulance.run’ सद्य स्थितीला 250 हुन अधिक ॲम्ब्युलन्स ऑपरेटर त्याचबरोबर 360 हुन अधिक ॲम्ब्युलन्स बरोबर कार्यन्वित आहे.
हे ॲप Google plystore वर उपलब्ध आहे. आणि आपण www.ambulance.run हया संकेतस्थळावर ॲम्ब्युलन्स बुक करु शकता.