मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी 20 मोटार बाईकचा समावेश करण्यात आला असून, त्याचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाला.
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या ‘शिव आरोग्य योजना व आपत्कालीन वैद्यकीय सेवे’अंतर्गत २ ऑगस्ट २०१७ पासून मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत १० बाईक ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आल्या होत्या. आता या सेवेत आज आणखी वीस बाईक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. या बाईक ॲम्ब्युलन्स मुंबईसह पुणे, ठाणे, अमरावती, पालघर, नंदुरबार या ठिकाणी सेवा देणार आहेत.१०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही बाईक ॲम्ब्युलन्स तत्काळ उपलब्ध होऊन रुग्णावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतात. या बाईक ॲम्ब्युलन्स चालविणारे प्रशिक्षित डॉक्टर असून त्यांच्यासोबत आवश्यक औषधे, श्वसनमार्गावरील उपचारासाठी लागणारी उपकरणे, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असणार आहेत.
यावेळी रावते म्हणाले, अपघातात ‘गोल्डन अवर’ काळात रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी ही सेवा आवश्यक आहे. मुंबईतील अनेक भागात तसेच राज्यातील आदिवासी पाड्यासारख्या दुर्गम भागात रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोचविण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. सावंत यांनी सांगितले, आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या काही तासात प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक असते. अशा काळात रुग्णांपर्यंत तातडीने पोहोचण्यासाठी बाईक अँम्ब्युलन्स सेवा महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईत ही सेवा सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे २६०० लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. आता मुंबईबरोबरच राज्यातील इतर भागातही या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. यावेळी व्यासपीठावर आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. संजीव कुमार, आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. सतीश पवार, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, आयडीबीआयचे मुख्य सरव्यवस्थापक प्रदीपकुमार दास, सरव्यवस्थापक शरद कामत आदी यावेळी उपस्थित होते.