मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार अवस्थेत पोहोचत आहे. शिवसेनेने तर पालिकेतील माजी विरोधीपक्षनेते आणि कॉंग्रेसचे अभ्यासू नेते देवेंद्र आंबेरकर यांनाच आज गळाला लावले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मराठी माणसांवर काँग्रेसमध्ये अन्याय होतो, त्यामुळेच या पक्षाला रामराम ठोकला, अशी प्रतिक्रिया आंबेरकर यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर दिली.
अंधेरी पश्चिम येथील आंबोली हिल प्रभागातून निवडून आलेले आंबेरकर हे काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते होते. भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रवीण छेडा यांना दोन वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. तेव्हापासून ते नाराज होते. अखेर त्यांची नाराजी बाहेर आली आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.