![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2017/12/rpi-copy-300x225.jpg)
ठाणे,(विएम) : ठाणे शहरात एकीकृत रिपाइंचे वारे वाहू लागले आहेत. रिपाइं एकतावादीचे अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ठाण्यातील सर्व रिपाइं गटांची एकत्रित मोट बांधावी; आम्ही सर्व निवृत्त अधिकारी आणि आंबेडकरी समाज इंदिसेंच्या नेतृत्वाखाली चळवळीचे काम करू, असा सूर ठाण्यातील एका कार्यक्रमात रिपाइंच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आळवला. एकसंघ रिपाइं उभारण्यासाठी आपला पक्ष बरखास्त करू, असे प्रतिपादन इंदिसे यांनी केले.
जालिंदर यादव माझगाव डॉकच्या उपमहाप्रबंधक या पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून यादव यांचा नागरी सत्कार रविवारी रात्री शास्त्री नगर येथे करण्यात आला. आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणार्या अनेक मान्यवरांनी रिपाइं ऐक्याची भूमिका मांडली.
सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान माजी न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे आणि माजी पोलीस उपायुक्त सुरेश सूर्यवंशी उपस्थित होते. मधू मोहिते, सायन रुग्णालयाचे समाज विकास अधिकारी डॉ. प्रकाश गायकवाड, माझगाव डॉकचे मुख्य व्यवस्थापक नामदेव आवाड, माजी पोलीस उपायुक्त विजय परकाळे, सुनील कदम, काँग्रेसचे नेते सुखदेव उबाळे, सुरेंद्र शिंदे, भिवंडीचे नगरसेवक तथा रिपाइं एकतावादीचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम , उत्तमराव खडसे, सरकारी वकील मोरे, प्रदीप मुन, पत्रकार आनंद कांबळे, अनिल ठाणेकर, दीपक सोनवणे, ऍड. किर्ण कांबळे, संजय भालेराव
आदी उपस्थित होते.
यावेळी मधु मोहिते, सुनील कदम, नामदेव आवाड, विजय परकाळे, ऍड. मोरे, सुखदेव उबाळे यांनी रिपाइं ऐक्याचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात ऐक्य होईल किंवा नाही, हे माहित नाही. मात्र, ठाण्यात हे ऐक्य होऊ शकते. त्यासाठी इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळीचे काम करण्यास तयार आहोत, असे सर्वांनी नमूद केले.
समारंभाचे अध्यक्ष न्या. (निवृत्त) अवसरमोल यांनीही समाजाची ऐकी झाली तर राजकीय-सामाजिक कायदेविषय अधिकारांचे हनन करण्याची हिमंत कोणाचीही होणार नाही, असे सांगितले.
राज्यातील दलित समाज संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. समाजाला कोणीही वाली उरलेला नाही. जर, आपले ऐक्य असते तर कोणाचीही समाजाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिमंत झाली नसती. नितीन आगे हत्याकांडातील आरोपी निर्दोष सुटणे, हे समाजासाठी संकटाची चाहूल आहे. ऐक्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन सर्वच नेत्यांशी संवाद साधू या, असे इंदिसे म्हणाले.
सत्काराला उत्तर देताना जालिंदर यादव यांनी, ठाण्यातून ऐक्याची सुरुवात होत असेल तर मी माझे उर्वरित आयुष्य फक्त सामाजिक नव्हे तर राजकीय चळवळीसाठीही खर्ची घालण्यास तयार आहे.