
नवी दिल्ली : डाव्या पक्षांनी देशातील नागरिकांना १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता, लाॅकडाऊनची सर्व बंधने पाळून शपथ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यानिमित्त भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, (मार्क्सवादी- लेनिनवादी) लिबरेशन, अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP) यांनी निवेदन जारी केले आहे.
असा आहे शपथेचा मसुदा :
१. आम्ही आपल्या राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतो.
२. या लाॅकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरीब व गरजू लोकांना तातडीने रोख रकमेचे हस्तांतरण व अन्नवाटप करण्याची मागणी पुढे रेटण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची आम्ही शपथ घेतो.
३. धर्म, जात, लिंग किंवा अपंगत्व यावर आधारित भेदभावविरहित अशी जनतेची सामाजिक एकजूट मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. लाॅकडाऊनच्या प्रतिबंधांचे पालन करण्याच्या नावाखाली लोकांचे जीवन, स्वातंत्र्य, लोकशाही अधिकारांवर हल्ला किंवा अस्पृश्यतेची अभिव्यक्ती व भेदभाव होता कामा नये याची आम्ही दक्षता घेऊ.
“सामाजिक ऐक्यासह शारीरिक अंतर” राखणे ही आपली हाक आहे, “सामाजिक अंतर” राखणे नाही हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करू.
४. लोकांना अज्ञान, अंधश्रद्धा आणि पूर्वग्रहांच्या विरुद्ध शिक्षित करण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनापासून प्रेरणा घेऊन आम्ही ही शपथ घेतो की लाॅकडाऊनच्या काळात ज्यांना त्यांचे जीवन आणि रोजीरोटी वाचवण्यासाठी पाठिंब्याची आणि मदतीची गरज आहे त्यांना ती देण्यासाठी पुढाकार घेऊ.
एकत्र जमणे किंवा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे शक्य नसल्यामुळे लोकांनी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कोणत्याही सुरक्षित आणि सोयीच्या ठिकाणी ही शपथ घ्यावी, असे डाव्या पक्षांनी म्हटले आहे.
















