मुंबई, (निसार अली) : राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती मालाडमध्ये अनोख्या उपक्रमाने साजरी केली जाणार आहे. बाबासाहेबांना ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले आहे, त्यांच्या वारसांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांत वारसांकडून आंबेडकरांविषयी असलेली आठवण आणि त्यांच्या पुर्वजांनी त्यांच्याविषयी सांगितलेली माहिती ऐकता येणार आहे.
ना.म जोशी, दादासाहेब दोंदे, राव बहादूर केशवराव बोले, देवराव नाईक, सुरबानाना टिपणीस, भाई अनंत चित्रे, शां. शं रेगे, बाबुजी कवळी, श्रीधरपंत टिळक, नाना पाटील , सिताराम जोशी, दत्तात्रय प्रधान, अनंत काणेकर, फत्तेलाल खान, दगडूशेठ भिलारे,चंद्रकांत अधिकारी, विनायक गणपत राव, बाळ साठे, केळूस्कर गुरूजी, केशव सिताराम ठाकरे तसेच महाराजा सयाजी राव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, हैद्राबादचे निजाम अशा विविध जाती धर्मातील असलेल्या लोकांचा राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सहकार्य लाभले. आज याच सहकार्यांतील वारसांचा कुठेतरी सन्मान व्हावा आणि समाजाला त्यांची माहिती मिळावी, या उद्देशाने राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्यावतीने ५ मे रोजी, सायंकाळी ५ वाजता, निधीवन ग्राऊंड,पवन बाग, चिंचोली बंदर, मालाड (पश्चिम) येथे हा जयंती उत्सव होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक एफडीआय आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आहेत. कार्यक्रमाची संकल्पना डॉ. विजय कदम यांची असून सुनिल मोहिते, विजय जाधव यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.