मुंबई (निसार अली) : आंबेडकरांचे विचार हे फक्त दलित समाजाच्या उन्नतीसाठी नसून अखिल मानव जातीला उन्नतीकडे नेणारे आहेत. याची जाणीव आता ओबीसी समाजालाही होऊ लागली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यास सर्वांनी कटीबद्ध असले पाहिजे असे विचार मारुती कुंभारे यांनी व्यक्त केले.
आंबेडकर सेंटर फाँर जस्टीस अँड पीसने ‘महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती चारकोप येथे साजरी करण्यात आली. त्यावेळी वर्हाडे यांनी विचार मांडले. निवृत्त न्यायाधीश एन.जी घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत योगेश व-हाडे हेही वक्ते म्हणून उपस्थित होते.
देशात सांप्रदायिक शक्तींची वाढ होत आहे. ही वाढ राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांवर अतिक्रमण करणारी ठरु शकते. तसेच देशात दलित व अल्पसंख्याक यांच्यावर होणार्या अत्याचाराच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या सांप्रदायिकतेविरोधात आणि राज्यघटनेतील स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता या मुलभूत तत्वांच्या रक्षणासाठी सर्व भारतीयांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत योगेश व-हाडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागसेन सोनारे आणि सूत्रसंचालन जी.एस.साळवी यांनी केले. प्रा.वामन निळे, ए. पी. मालेकर, प्रा. राजेंद्र सैंदाणे, आर. व्ही. सदावर्ते, एच. एन. जनबंधू, दिपक राक्षे आदी यावेळी उपस्थित होते.