मुंबई : भिमा कोरेगाव प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढू. असे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाहीत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिला.
रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटी दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांव्दारे व्हावी असा आग्रह आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल.असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. त्यासाठी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढू. भिमा-कोरेगाव येथील व्यवस्थेसाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी आंबेडकर यांनी या प्रकरणी सर्वंकष चौकशी तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. भिमा कोरेगाव तसेच परिसराच्या प्रत्यक्ष भेटीतील माहितीही दिली. चर्चेअंती त्यांनी शासन या प्रकरणाची नि:स्पृहपणे चौकशी करेल, असा विश्वास आहे. जेणेकरून महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित होईल, असेही नमूद केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.