रत्नागिरी, (आरकेजी) : चिपळूण तालुक्यातील आंबतखोल येथील धरणात सोमवारी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल सतरा तासांनंतर सापडला. अजय गुडेकर असे (२०) त्याचे नाव होते. तो सावर्डेतील गुडेकर वाडीत राहत होता.
अजयच्या शेजारी राहणारे शंकर कदम यांची धरणा शेजारी जमीन आहे. त्या जमिनीच्या मोजणीसाठी विश्वनाथ निकम याच्यासोबत अजय गेला होता. मोजणी आटोपल्यानंतर अजय हातपाय धुण्यासाठी धरणामध्ये उतरला. अर्धा तास उलटून गेला तरी अजय आला नाही हे पाहण्यासाठी विश्वनाथ धरणाकडे गेला, त्यावेळी त्याचे कपडे काठावर दिसले. त्याने आरडाओरड केली. मग गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने अजयला शोधण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. पण तो सापडला नाही. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात आली. दुपारच्या सुमारास अजयचा मृतदेह धरणात तरंगताना दिसला. ग्रामस्थांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला. सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.