रत्नागिरी, (आरकेजी) : सागरी जीवसृष्टील ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांची रोडावत चाललेली संख्या कासव संवर्धनाची मोहिमेंतर्गत वाढवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या हंगामात तब्बल ९ हजाराहून अधिक कासवांची अंडी या हंगामात संरक्षीत केली गेली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील १६७ किमी. लांबीच्या किनाऱ्यांवर या वर्षी कासवांच्या पिल्लांचे विक्रमी संरक्षण झाल आहे.
मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर अशा तालुक्यांना सुंदर आणि विस्तीर्ण किनारा लाभला आहे. त्यामुळे या किनाऱ्यांचा लाभ आता इथं अंडी घालण्यासाठी येणाऱ्य़ा कासवांना होवू लागला आहे. वनविभागाच्या मदतीने रत्नागिरी जिल्ह्यातील ११ ठिकाणे कासव संवर्धन मोहिमेसाठी संरक्षित केली गेली आहेत. वेळास किनारा, आंदर्ले किनारा, कोळथरे किनारा, दाभोळ किनारा, केळशी किनारा, कर्दे किनारी, लाडघर किनारा, मरुड किनारा, गुहागर किनारा, माडबन किनारा, गावखडी किनारा हि ती अकरा ठिकाणे आहेत.
२००२ सालापासून सुरु असलेल्या या मोहिमेला आता कुठे यश येताना पहायला मिळत आहे. या हंगामात तब्बल ९५१५ अंडी वनविभागाने संरक्षीत करण्यात यश मिळवले. म्हणजेच तब्बल ८६ अंड्यांची घरटी वनविभागाने जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर संरक्षीत झाली.
वनविभागामुळेच यश
मोहिम राबवताना वनविभागाचे अधिकारी विशेष काळजी घेत आहेत. एकेक वेळी तर पूर्ण दिवस कासव कोणत्या ठिकाणावर अंडी घालते? याचा शोध त्यांना घ्यावा लागत आहे. त्यामुळे रात्रं-दिवस वनविभागाचे कर्मचारी या कार्यात गुंतलेले असतात. त्यांच्या मेहनतीमुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कासव संवर्धनाची मोहिम राबवता आली आहे.