अलिबाग : अलिबाग शहरात पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातील पहिल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. राज्यातील कलावंतांना चांगले, हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे. म्हणुनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करुन राज्याची सांस्कृतिक संपदा जोपासणार, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री विनोद तावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, आमदार सर्वश्री जयंत पाटील, सुनिल तटकरे, सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, धैर्यशील पाटील, बाळाराम पाटील, मिनाक्षीताई पाटील, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नलिनी, पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील तसेच जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे कळ दाबून ॲड. नाना लिमये रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. त्यानंतर अलिबाग येथील नमन नृत्य संस्थेच्या कलावंतांनी नांदीनृत्य सादर करुन या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पाटील यांचा फडणवीस यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करुन अभिष्टचिंतन करण्यात आले.
फडणवीस म्हणाले की, अलिबाग येथे अत्यंत चांगले नाट्यगृह उभे राहिले आहे. सुंदर आणि सुसज्ज नाट्यगृह सहकार क्षेत्रामार्फत सुरू झाले, हे काम चांगले आहे, म्हणूनच अशा चांगल्या कामांच्या पाठीशी सरकार उभे आहे. राज्यात कलेचे क्षेत्र रुंदावत आहे. असे असतांना विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी राज्यात चांगल्या नाट्यगृहांची आवश्यकता आहे. नाट्यकला ही राज्याची सांस्कृतिक संपदा आहे. ही संपदा जोपासण्यासाठी राज्यात नवी नाट्यगृहे उभारण्यासाठी चालना देतांनाच जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करण्यासही शासनाचे प्राधान्य असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्याच प्रमाणे सिनेरसिकांना दर्जेदार सिनेमे पाहता यावे यासाठी थिएटर उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना फडणवीस म्हणाले की, जयंत पाटील यांनी हाती घेतलेले काम उत्तम करण्याचा प्रयत्न असतो,राजकारणाच्या पलिकडले संबंध जपणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे नेतृत्व हे संघर्षशील, आत्मविश्वासपूर्ण आणि उत्तमतेचा ध्यास असलेले नेतृत्व आहे, अशा शब्दात फडणवीस यांनी पाटील यांचा गौरव केला. तसेच अलिबाग येथे खुले नाट्यगृह उभारण्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी बोलतांना दिले.
तिकीटांवरील जीएसटीतून उभारणार नाट्यगृहे- विनोद तावडे
जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून नाट्य व चित्रपट निर्मात्यांना वाटणारी चिंता लक्षात घेता शासनाने २५० रुपयांवरील तिकीटांवर जीएसटी आकारण्याची मर्यादा ही ५०० रुपयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती जीएसटी नियामक मंडळाला केली आहे. तिकीटांवरील कराच्या रकमेतून राज्याला प्राप्त होणारा निधी नाट्यगृहे बांधण्यासाठीच वापरायचा असे धोरण शासनाने ठरविले आहे, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे जाहीर केले.