रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या 86 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध पुरस्कार दिले जाणार आहेत. हा सोहळा येत्या बुधवारी 27 मार्चला सायंकाळी 4.30 वाजता मंडळाच्या जोशी पाळंद, रत्नागिरी येथील श्री भगवान परशुराम सभागृहात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे.
कै. सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार निवृत्त मुख्याध्यापिका शुभांगी भावे, निवृत्त शिक्षिका प्रेमा पटवर्धन, आबलोली येथील शिक्षिका नमिता वैद्य यांना दिला जाणार आहे. साडी, श्रीफळ, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्कृतप्रेमी पुरस्कार डॉ. मेधा लिमये यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र या स्वरूपात तर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार पोलिस पदक प्राप्त पोलिस हवालदार राजेंद्र भाटकर व संजीव बर्वे यांना प्रत्येकी 5 हजार रुपये, सन्मानपत्र या स्वरूपात प्रदान केला जाईल. समशेरबहाद्दर पुरस्कार तासगाव येथील गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेचा विद्यार्थी सौरभ जाधव याला साडेसहा हजार रुपये व सन्मानपत्र या स्वरूपात दिला जाईल. मंडळाच्या कै. ल. वि. केळकर विद्यार्थी वसतीगृहातील अक्षय कोकणे याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार तर कै. सौ. आनंदीबाई त्रिविक्रम केळकर विद्यार्थिनी वसतीगृहातील ऋचा बापट हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कै. सदाशिव बर्वे यांच्या स्मरणार्थ दिला जाईल. तसेच कै. उदय ओक स्मरणार्थ सुशांत केतकर याला हुषार विद्यार्थी पारितोषिक देण्यात येईल. या कार्यक्रमात लोकमान्य टिळक पारितोषिक संस्कृत व गणित विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाईल.तसेच कै. केशव अच्युत जोशी व कै. सुलोचना केशव जोशी यांचे स्मरणार्थ बी. ए. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत समाजशास्त्र व मराठी या विषयात सर्वाधिक गुण मिळवणार्या विद्यार्थ्यास पारितोषिक दिले जाईल. कै. सत्यभामाबाई फडके निधीतून अनघा आठवले यांना अर्थसाह्य दिले जाईल. मंडळातर्फे जीवनगौरव पुरस्कार करसल्लागार दिनकर माळी यांना सन्मानपूर्वक प्रदान केला जाईल. खेड येथील ह.भ.प. भगवानबुवा कोकरे यांना त्यांच्या गोपालन व कीर्तन-प्रवचनातून समाजजागृती या कार्याबद्दल मंडळामार्फत त्यांचा विशेष गौरव केला जाणार आहे.
विशेष सत्कारामध्ये मंडळाने सादर केलेल्या 58 व्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत संगीत संशयकल्लोळ नाटक सादर करून अभिनयाची दोन रौप्यपदके पटकावली. दिग्दर्शक वामन जोग, रौप्यपदक प्राप्त चंद्रशेखर जोशी, पौर्णिमा साठे यांना गौरवण्यात येईल. तसेच महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मैत्रेयी गोगटे, सीएच्या परीक्षेतील गुणवंत वरद पटवर्धन, पोमेंडी येथील कृषी केंद्राचे अधिकारी राजेंद्र कुंभार यांनाही मंडळामार्फत सन्मानित केले जाणार आहे. तसेच वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कारही या वेळी केला जाईल.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे कार्य
शुभांगी भावे या बियाणी बालकमंदिरच्या निवृत्त मुख्याध्यापिका आहेत. प्रेमा पटवर्धन यांना महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. नमिता वैद्य या पाटपन्हाळे हायस्कूल येथे शिक्षिका आहेत. पोलिस हवालदार राजेंद्र भाटकर यांना पोलिस महासंचालक यांच्याकडून पोलिस पदक पालकमंत्र्यांच्या हस्ते प्राप्त झाले आहे. संजीव बर्वे हे शाळा, कॉलेजमध्ये सैनिकी जीवन, युद्ध, परमवीरचक्र पुरस्कारांची माहिती देऊन देशप्रेम जागृत करतात. जीवनगौरव पुरस्कारप्राप्त दिनकर माळी हे 1984 मध्ये नागपूर विद्यापीठातून बी कॉम झाले. शिक्षकी नोकरी नंतर सी. यू. हळबे यांच्याकडे सहाय्यक म्हणून नोकरी केली. नंतर टप्प्याटप्प्याने एमकॉम, जीडीसीए, डिप्लोमा टॅक्सेशन लॉ व 2010 मध्ये एलएलबी केले. हभप भगवानबुवा कोकरे हे लोटे येथील माळरानावर गोशाळेत जखमी गायींचा सांभाळ करतात. डॉ. मेधा लिमये यांनी गणितातून पदवी शिक्षण घेतले व संस्कृतमधून पीएचडी केली. सध्या त्या संस्कृत विषयात अभ्यास करत आहेत.