रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर यांच्याविरोधात काँग्रेसमधील ज्येष्ठ कार्यकर्ते अकबर खलफे उभे ठाकलेत. आताचा उमेदवार काँग्रेसच्या व्याख्येत बसत नाही. दहशतवादी संघटनांबरोबर संबंध असल्यामुळे हा उमेदवार योग्य नाही. त्यामुळे याचा आपण निषेध करत असून हा उमेदवार काँग्रेसने बदलावा अन्यथा आपण निवडणूक लढवू असा इशारा अकबर खलफे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे. अकबर खलफे यांनी यापूर्वी 2009 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती.
सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आरोप झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर चर्चेत आले होते. त्यांची उमेदवारी रद्द होते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र काँग्रेस हायकमांडने बांदिवडेकर यांची बाजू ऐकून घेऊन त्यांची उमेदवारी कायम ठेवली होती.. मात्र आता बांदिवडेकरांच्या उमेदवारीमागील शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाहीय. आता रत्नागिरी जिल्ह्यातील अकबर खलपे बांदिवडेकरांच्या विरोधात उभे ठाकलेत. आपण काँग्रेसचे जुने कार्यकर्ते असून बांदिवडेकरांची उमेदवारी काँग्रेसच्या धोरणात बसत नसल्याचं खलफे यांचं म्हणणं आहे. बांदिवडेकर यांचा संबध सनातन संस्थेशी असून त्यांची उमेदवारी काँग्रेसने रद्द करावी, यासाठी आपण हायकमांडला भेटणार आहोत.त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी आपण करणार आहोत. मात्र तरी सुद्धा काँग्रेसने बांदिवडेकरांची उमेदवारी रद्द करून दुसरा उमेदवार दिला नाही तर आपण स्वतः या विरोधात निवडणूक लढवू असा इशारा खलफे यांनी दिला आहे.
अकबर खलपे यांनी 2009 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 4516 मतं पडली होती.