एशियाटिक सोसायटीमधील नुतनीकृत मध्यवर्ती ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहाचे उदघाटन
मुंबई : ऐतिहासिक वास्तू वैयक्तिक संपत्ती आहे, असे समजून प्रत्येकाने त्याचे जतन व संवर्धन करायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एशियाटिक सोसायटीमधील नुतनीकृत मध्यवर्ती ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहाच्या उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले.
बांधकाम विभागाकडे नुतनीकरणासाठी घेण्यात आलेल्या या मुख्य सभागृहाचे काम पूर्ण झाल्याने ते उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मा.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हस्तांतरीत करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी, पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती वल्सा नायर – सिंह, आदी यावेळी उपस्थित होते.
नुतनीकृत मध्यवर्ती ग्रंथालयाचे मुख्य सभागृह मुंबईकरांसाठी नवीन वर्षात एक पर्वणी उपलब्ध झाली आहे. या सभागृहात अनेक प्रकारची दुर्मिळ व वाचकांसाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांचा वाचकांनी लाभ घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाच्या बाह्यभागात आजवर अनेक चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. यापुढे नुतनीकृत सभागृहामध्ये सुट्टीच्या दिवशी चित्रिकरणाची परवानगी देण्याचा विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
नुतनीकरणाचे कामकाज प्रज्ञा वाळके, कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.